नगर : निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन राज्य शासनाच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयात युध्दपातळीवर सुरु असून, विविध शाखांमध्ये अनावश्यक कागदपत्रांचा तसेच फायलींचा निपटारा सुरु आहे. आपापल्या कार्यालयातील दप्तर व्यवस्थित ठेवा, स्वच्छता राखा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिले आहेत.
गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यादृष्टिने दप्तर दिरंगाई टाळीत कामकाज पारदर्शी व्हावे, महसूल कार्यालयीन कामकाजात प्रशस्तपणा यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची धावपळ सुरु आहे.
गेल्या दोन दिवसांपासून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे,भूसंपादन उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोनाली म्हात्रे, तहसीलदार शरद घोरपडे, रवींद्र सबनीस, योगेश शिंदे आदी विविध शाखांना भेटी देत असून तेथील कामकाजाची पाहाणी करत आहेत.
कार्यालयातील अनावश्यक फायली व कागदपत्रांचा लवकरात लवकर निपटारा करावा, कपाटे स्वच्छ ठेवा जणेकरुन काम करण्यासाठी प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी कर्मचार्यांना दिल्या.
शंभर दिवसांचा कृती आराखड्यातंर्गत अभिलेख निंदनीकरण-वर्गीकरण,मुदत बाह्य अभिलेखे नष्ट करणे,जड वस्तुसंग्रह नोंदवही अद्यायावतीकरण, जुन्या व निरोपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट असे प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण दहा मार्क निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळेच सर्वच शाखांनी दक्षतेने कामगिरी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या वतीने कामांची तपासणी होणार आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय हे नाशिक विभाग आणि राज्यस्तरावर अव्वल यावे यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सर्वच महसूल शाखांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो. ते ठिकाण स्वच्छ आणि प्रशस्त असेल तरच दैनंदिन कामकाजात सकारात्मकता राहील, अशी भावना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी व्यक्त केली.