नगरकरांकडे मालच माल ! बँका-पतसंस्थांमध्ये तीन वर्षांत वाढल्या 59 हजार कोटींच्या ठेवी

पतसंस्था, पगारदार संस्था, सहकारी बँकांमध्ये एकूण ठेवी 93 हजार कोटींच्या
Ahilyanagar news
तीन वर्षांत वाढल्या 59 हजार कोटींच्या ठेवी Pudhari
Published on
Updated on

गोरक्ष शेजूळ

नगर : जिल्ह्यात काही मल्टिस्टेट, पतसंस्था, बँकांमध्ये गडबड सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र तरीही सहकारी संस्थांवर जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील 1091 नागरी/ग्रामीण पतसंस्था, 203 पगारदार संस्था आणि 17 सहकारी बँकांमध्ये 19 लाख 81 हजार 392 ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने आपल्या 92 हजार 390 कोटींच्या ठेवी ठेवल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे वाढती महागाई, दुष्काळी परिस्थितीने मध्यमवर्गीय घटक होरपळला असल्याचे बोलले जात असताना गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ठेवींमध्ये तब्बल 59 हजार कोटींची वाढ झाल्याची दिलासादायक माहिती पुढे आली आहे.

अहिल्यानगर हा सहकार चळवळीला गती देणारा जिल्हा आहे. येथे काका कोयटे, सुरेशराव वाबळे, शिवाजीराव कपाळे, कडूभाऊ काळे, अण्णासाहेब चोथे, संजय कडूस, प्रा. भाऊसाहेब कचरे, रावसाहेब रोहोकले, बापूसाहेब तांबे, आदींनी पतसंस्था, पगारदार सेवकांच्या संस्था चांगल्या स्थितीत ठेवल्या. त्यामुळे आज सहकारी संस्थांवर जनतेचा विश्वास कायम असून, हे वाढत्या ठेवींमधून स्पष्टपणे दिसून येते.

बँका, पतसंस्थांमध्ये ठेवीला साधारणतः 7 ते 9 टक्क्यांप्रमाणे व्याज दिले जाते. दर वर्षी लाभांशही दिला जातो. कर्जाला 11 ते 16 टक्के व्याजदर आकारले जाते. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सर्वांत कमी 7 टक्के व्याज आहे. कमी वेळात आणि लवकरात लवकर कर्ज मिळत असल्याने कर्जदारांचा कलही या संस्थांकडे अधिक दिसतो. ठेवीदारांनाही संस्था वरीलप्रमाणे आकर्षक व्याज देते, त्यामुळे ठेवीदारही आपले पैसे पतसंस्थांमध्ये गुंतवताना दिसतात. शिवाय या ठेवींना सहकार विभागाच्या नव्या धोरणांनुसार संरक्षण आहे.

पगारदारांच्या संस्थांमध्ये 73 हजार कोटींच्या विक्रमी ठेवी

जिल्ह्यात 203 पगारदार सेवकांच्या पतसंस्था आहेत. त्यांच्याकडे 77 हजार 778 सभासद आहेत. त्यांचे वसूल भागभांडवल हे 34 हजार 552 कोटी आहे. 2 लाख 91 हजार 165 कोटींचे खेळते भांडवल आहे. 63 हजार 603 कोटींचा स्वनिधी आहे. तर अ आणि ब वर्ग सभासद मिळून 73 हजार 125 कोटींच्या ठेवी आहेत. सभासदांकडे 1 लाख 06 हजार 229 कोटींचे कर्ज येणे बाकी आहे. दोन वर्षापूर्वी पगारदार सेवकांच्या संस्थांकडे 592 कोटी ठेवी होत्या. या संस्थांमध्ये 139 कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत.

सहकारी बँकाँतही 7232 कोटींच्या ठेवी

जिल्ह्यात सद्यःस्थितीत 17 सहकारी बँका सुरू आहेत. त्यांच्याकडे 1 लाख 79 हजार 840 सभासद असून, त्यांनी आपल्या 7232 कोटींच्या ठेवी या बँकांमध्ये ठेवल्या आहेत. तर 4823 कोटींचे कर्ज बाकी आहे.

पतसंस्थांमध्ये 12 हजार कोटींच्या ठेवी

जिल्ह्यातील नगर शहरासह 14 तालुक्यांत दोन वर्षांपूर्वी 872 नागरी संस्था होत्या. दोन वर्षांत 219 नव्या संस्था सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आज 1091 पतसंस्था कार्यरत आहेत. या सर्व पतसंस्थांमध्ये 17 लाख 23 हजार 774 सभासद आहेत. या संस्थांकडे 724 कोटीचे भागभांडवल आहे, 16 हजार 544 कोटींचे खेळते भांडवल आहे. 2332 कोटींचा स्वनिधी आहे. या सर्व संस्थांकडे 12 हजार 033 कोटींच्या ठेवी आहेत. सभासदांकडून 9789 कोटींचे कर्ज येणे बाकी आहे.

संगमनेर, कोपरगावच्या पतसंस्था गर्भश्रीमंत

कारखानदारी, सहकारी संस्थांचे जाळे, यातून फुललेली बाजारपेठ यामुळे सर्वांत जास्त ठेवी संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील पतसंस्थांमध्ये दिसतात. ठेवीदारांनी विश्वासाने वेगवेगळ्या संस्थांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. संगमनेरात सर्वाधिक 2341 कोटींच्या; तर कोपरगावात 2095 कोटींच्या ठेवी आहेत. सर्वांत कमी ठेवी शेवगाव तालुक्यात 127 कोटी, तर पाथर्डी तालुक्यात 131 कोटींच्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news