

शिर्डी : दुहेरी हत्याकांडाने भयभीत झालेल्या शिर्डीतील गुन्हेगारी अजुनही थांबताना दिसत नाही. शहाणे हाउसिंग सोसायटी आणि पिंपळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या दोन घटना घडल्या. या घटनेत एका शेतकर्यावर जबरी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, तर एका मंदिरातही धाडसी चोरी केल्याचे पुढे आले आहे.
साई संस्थानचे कर्मचारी राहुल ओहोळ हे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या पत्नीही रात्री ड्युटीवर असल्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरातून अडीच तोळे सोने आणि 25 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी ओहोळ यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, शिर्डीतील घरफोडी प्रकारानंतर सकाळी नगर येथून श्वान पथकाला बोलवण्यात आले होते. चोरी झालेल्या ठिकाणी श्वानाने जाऊन वास घेत बाहेर काही अंतरापर्यंत मागं दाखविला चोरटे तिथून वाहनाने प्रसार झाले असावे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला.
हनुमान मंदिरातील दानपेटी चोरी
पिंपळवाडी येथील सिद्धेश्वर हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली. या घटनेची तक्रार ग्रामस्थांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिली आहे.
निमगाव कोराळे गावात राहत असलेल्या रवींद्र माळी यांचा मुलगा रोहित यांच्यासमोर चार वर्षापुर्वी धारदार शस्त्राने खुन करण्यात आला होता. त्यात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील सध्या जामिनावर सुटलेला खुनातील एक आरोपी रवींद्र राजेंद्र बनसोडे याने 11 फेब्रुवारी रोजी तुझ्या वडीलांचा खुन झाला आहे, तु साक्षीदार आहेस, आमच्या विरोधात कोर्टात साक्ष देऊ नको, ती केस तु मागे घे, नाहीतर तुझ्या वडीलासारखाच तुला संपुन टाकु, अशी धमकी दिल्याची तक्रार रोहित रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली.
शिर्डी शहरात साई दर्शनासाठी व लग्नसमारंभासाठी गुजरात राज्यातील विजया विजय माळी या पतीसह आलेल्या असताना नगर-मनमाड रोड रात्री 10,30 वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तरुणांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन व मनिमंगळसुत्र ओरबाडून नेले. शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी जवळील रुई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाणार्या शेतकर्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. छबूराव बाबूराव भडांगे हे शेतातील पाणी पंप सुरू करून घरी जात असताना, झुडपात दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांना पोत्यात टाकण्याचा प्रयत्न करत जबर मारहाण केली. या हल्ल्यात भडांगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायावर आणि हातावर तीव्र मार लागला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील रोकड न लंपास करता फक्त मोबाईल आणि दुचाकीची चावी घेऊन पसार झाले, त्यामुळे हा घातपात करण्याचा प्रयत्न असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिर्डी पोलिसांनी ओहोळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये भडांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.