मी राज्याचे नेतृत्व करत असताना काँग्रेसच्या 82 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी 82 जागांच्या 42 केल्या. आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 जागा आणल्या. इतकी दयनीय अवस्था कशी झाली, याबाबत काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केली.
नवनर्वाचित आमदार असलेल्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्यासह खासदार चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे येऊन साईदर्शन घेतले. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिरप्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा साईमूर्ती व शाल देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
‘चौदा वर्षे मी वनवास भोगला. मला त्रास देणारे घरी बसले,’ असे वक्तव्य चव्हाण यांनी केले होते. त्याबाबत ते म्हणाले, की शेवटी मीही मनुष्य आहे. मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी चौदा वर्षे वनवास भोगला, मला कोणाही विषयी राग नाही. मी साईबाबांचा भक्त असल्याने कोणावरही विनाकारण टीका करणे माझा उद्देश नाही. परंतु मला भावना आहेत. त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेन. त्यामुळे ‘त्यांनी’ मनावर घेऊन नये. राजकारणात हार-जीत होत असते, हे लक्षात ठेवावे. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर साहजिकच काहीसे दुःख होत असते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही असे सांगितले आहे.
उबाठा सेनेेचे संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत ते म्हणाले, की त्यांनी यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या त्याबद्दल त्यांना काय वाटते यावर अधिक भाष्य करणे योग्य राहील. आमच्या सरकारमध्ये कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार यांची चिंता त्यांनी करू नये.
काँग्रेसने आताच रडीचा डाव सुरू केला असल्याची टीका करत चव्हाण म्हणाले, की 2029 मध्येही ते निवडून येणार नाहीत, असे दिसते. त्यामुळे त्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यास सुरवात केली आहे. राज्यसभेत येण्याइतपत तरी संख्याबळ विरोधकांकडे असले पाहिजे. सर्व विरोधक मिळून 40-46 जागा आहेत. त्यात कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल. राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यसभेचा उमेदवार देखील निवडून येऊ शकत नाही. एकाला दरवेळी संधी द्यावी लागेल, अशी स्थिती सध्या विरोधकांची झाल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.