

नगर: कामगारांनी घेतलेली उचल बुडवू नये यासाठी त्यांच्या मुलांना ओलिस ठेवून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेण्याचा प्रकार नुकताच उघड झाला. मालकांकडून होणार्या मारहाणीमुळे आष्टी तालुक्यातून नगरला पळून आलेल्या दोन मुलांमुळे बीडमधून आणखी 15 मुलांची सुटका करण्यात आली. बालकल्याण समिती, कामगार आयुक्त व पोलिस अधीक्षकांच्या कृती दलाने ही कारवाई केली.
नगरच्या एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी बुधवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या मुलांसमवेत चर्चा केली. यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली.
या दोन मुलांनी सांगितलेली हकीकत अशी ः आठ वर्षांचा योगेश (रा. मुळशी, पुुणे) विजू शेठ याच्या घरी राहत होता. त्याला गुरे सांभाळण्याचे काम होते. सकाळी शेण काढणे, गोठा साफ करणे, लाकूड चारा आणणे अशी कामे त्याला सांगितली जात. नंतर तो शेळ्यांना चरायला नेई. सकाळी त्याला नाश्ता देत नव्हते, भाकरी-चटणी दिली जाई. हीच शिदोरी घेऊन तो गुरे चारण्यासाठी डोंगरात जात असे. एक दिवस गुरे व शेळ्यांसह परत येण्यास उशीर झाल्याने विजू शेठने त्याला बेदम मारहाण केली. योगेशचा मित्र शंकर (रा. गहूखेल तांडा, आष्टी, बीड) हा उत्तम शेठकडे कामाला होता. उत्तम शेठही शंकरला मारहाण करत होता.
पोटभर जेवण देत नव्हता. या मारहाणीला घाबरून योगेश व शंकर तेथून पळून आले. रात्री अंधारात आणि पावसात चालत राहिले. एका ठिकाणी एका व्यक्तीच्या झोपडीत झोपले. सकाळी त्या व्यक्तीने दिलेले 10 रुपये घेऊन ते दोघे रेल्वे मार्गाने चालत राहिले. 10 रुपयांचे बिस्कीट घेऊन खाल्ले. रस्त्यात कोणी बिस्कीट तर कोणी जेवण दिले. त्यांची विचारपूस करत दुसर्या एकाने त्यांना नगर एमआयडीसी पोलिस स्टेशनला नेले. पोलिसांनी विचारपूस करून त्यांना बालगृहात नेले...
या मुलांनी दिलेल्या माहितीनंतर बालकल्याण समितीने 17 जून रोजी आष्टी तालुक्यातील एका तांड्यावर 15 ते 16 बालकामगार डांबून ठेवल्याची तक्रार केली होती. त्यानुसार, कामगार आयुक्त (नगर) नवनाथ भिसले यांनी पोलिस अधीक्षकांच्या कृती दलाच्या मदतीने दि. 20 जून रोजी पहाटे पाच वाजता संबंधित तांड्यावर धाड टाकण्याचे नियोजन केले. कामगार आयुक्त, बालकल्याण समिती, पोलिस दलाचे पथक त्या ठिकाणी गेले. मात्र कार्यक्षेत्र बीडचे असल्याने फिर्याद कोणी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. बीडच्या कामगार आयुक्त कार्यालयाला घटनेची माहिती दिली. मात्र तेथून कोणीच आले नाहीत. त्यामुळे नगरच्या पथकाने स्वतःहून त्या 15 मुलांची तेथून सुटका केली आणि त्यांना अंभोरे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतरही दोन दिवस कामगार आयुक्त तिकडे फिरकले नाहीत. अखेर पोलिसांनीच फिर्याद देऊन नऊ मालकांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर त्यात बालकामगार अधिनियम, वेठबिगारी अन्वये कलम वाढविण्यात आली आहेत.
तांड्यावरून 17 बालकांची सुटका झाली आहे. मी स्वतः एमआयडीसी पोलिसांशी बोलल्यानंतर नगरमधून गुन्हा दाखल झाला. मुळातच हा गंभीर प्रकार आहे. यात नगरसह बीडच्या यंत्रणांचाही हलगर्जीपणा दिसला. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो.
-विवेक पंडित, अध्यक्ष, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती
बीड जिल्ह्यातील अंभोरे पोलिसांत संबंधित नऊ जणांवर गुन्हा दाखल करून, 15 मुलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र दोन मुले नगरच्या बालसुधारगृहात असल्याने येथे शून्य क्रमांकाने काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिक चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी