

संगमनेर: रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असताना झालेल्या वादातून महिला सरपंचाला मारहाण झाल्याची घटना मंगळापूर येथे गुरुवारी दुपारी घडली. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळापुरच्या सरपंच शुभांगी रमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दीपक वाळे, खंडू वाळे, अजित वाळे, मनीषा वाळे, सुवर्णा वाळे, तेजस्विनी वाळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या संदर्भात सखोल चौकशीची कारवाई सुरू केली असून यातील दोषीर्विरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान या संदर्भात दीपक वाळे यांनी म्हटले आहे, आमच्या मालकीच्या शेतामध्ये पूर्व वैमन्यासातून सरपंच पवार यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या प्लॉटिंग केलेल्या शेतीच्या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून असणारा गाव डांबरी रस्ता जेसीपी लावून काढून घेतला. त्यांनी शासनाचे नुकसान केले असून आमच्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार केली आहे.
आमच्या कुटुंबियांना दांडगाई करून सातत्याने दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या महिलेला मारहाण केली. ती रुग्णालयात उपचार घेत असताना आमच्याविरुद्ध खोटी फिर्याद करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात तहसीलदार यांना ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिली होती. मात्र प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असे वाळे यांनी सांगितले.