

नगर /अकोले :
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणी पातळी व साठा नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटमधून 1058 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अधिकारी प्रवीण भांगरे यांनी दिली आहे.
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने घाटघर उर्ध्व धरण ओव्हर-फ्लो झाले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी भंडारदरा धरणात झेपावत आहे. घाटघर, उडदावणे, साम्रद, कोलटेभे, शिगणवाडी, लव्हाळवाडी, मुतखेल परिसरात जोराचा पाऊस कोसळत आहे.
धरणातील पाणी साठा 7378 दशलक्ष घनफुटावर (66.84 टक्के) पोहचल्याने भंडारदरा धरणातील पाणी पातळी व पाण्याचा साठा नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटमधून 1058 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
विद्युत निर्मितीसाठी यापूर्वी 846 क्युसेकने पाणी सोडले आहे. अशा प्रकारे धरणातून एकूण 1903 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे निळवंडे धरणात 4634 दशलक्ष घनफुटावर पाणीसाठा पोहचला असून या धरणातून 900 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन अहिल्यानगर पाटबंधारे विभागाने केले आहे. दरम्यान, निळवंडे धरणातून दोन दिवसांपासून आवर्तन सुरू आहे.
भंडारदरा येथील पर्जन्यमान केंद्रावर बुधवारी 55, रतनगड 119, घाटघर 127, पांजरे 63, वाकी 59 तर निळवंडेत 12 मिलिमीटर पाऊस झाला. 1 जूनपासून आतापर्यंत भंडारदरा येथे 968, निळवंडे येथे 426, आढळा 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील अंबित, पिपळगाव खांड, वाकी, शिरपूंजे, सांगवी, पाडोशी, घोटी, शिळवंडी, आढळा हे लघुबंधारे भरले आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीवर शाखा अधिकारी प्रवीण भागरे, वसंत भालेराव, सुरेश हम्बीर, हौशीराम मधे, बाळू खडके, मंगळा मधे व कर्मचारी लक्ष ठेवून आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत दिवसभरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठावरील अकोले, संगमनेर व ओझर बंधार्याखालील तसेच राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यांतील नदीकाठावरील सर्व गावे, वस्त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ काढून घ्यावेत असे आवाहन अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, ओझर बंधार्यातून 41 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील गोदावरी, भीमा, सीना नदीपात्रांत विसर्ग सुरू असल्याचे जिल्हा आपत्ती प्राधिकरण विभागाने सांगितले.
भीमा : 12527
गोदावरी : 15775
सीना : 157
(क्यूसेक; सायंकाळी सहाची स्थिती)
नदीपात्रांतील विसर्ग
भीमा : 12527
गोदावरी : 15775
सीना : 157
(क्यूसेक; सायंकाळी सहाची स्थिती)