

Sangamner News: देशातील लोकशाही धोक्यात असून ती जपण्यासाठी सर्वांना लढावे लागणार आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी काम करायचं आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेले हे वक्तव्य हे एका व्यक्तीचे नसून हिच भाजपची खरी प्रवृत्ती असल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
महामानव भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्या वतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड, प्रा. हिरालाल पगडाल, अमर कतारी, काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, परभणीमध्ये दलित कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू होतो. त्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बीडमधील सरपंचाची हत्या करण्यात आली. यामागील खर्या आरोपी शोधले पाहिजे. या घटनेतील आरोपींना संरक्षण मिळते की काय अशी शंका निर्माण होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. भाजपची महाराजांवर कधीही श्रद्धा नव्हती. या घटनेतील भ्रष्टाचाराची चौकशी नाही. दुसरीकडे आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे. आंदोलन केले म्हणून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला होतो. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास संसदेमध्ये जाण्यापासून खा. राहुल गांधी व इतरांना रोखले जाते.
डॉ.आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याच्या प्रकरणावरून माध्यमांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी खोटी घटना दाखवून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब गायकवाड, अमर कतारी, प्रा. हिरालाल पगडाल, राजू खरात, अनुराधा आहेर, अनिकेत घुले यांनीही भाजपवर जोरदार टीका केली.