

संगमनेर: शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासाठी वर्ग केलेल्या रकमेच्या बदल्यात दोन लाखांची लाच मागितल्यानंतर त्यातील 50 हजार रुपये शाळेच्या आवारातच स्वीकारताना शाळेचा सहायक सेक्रेटरी (सचिव) आणि कॅशियर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले.
शुक्रवारी (दि. 27 जून) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या दोघांची येथील शासकीय विश्रामगृहावर उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली. नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, असे समजते. (Latest Ahilyanagar News)
याबाबत माहिती अशी की, शाळा सुरू होण्यापूर्वी शासन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आणि अन्य सात ते आठ सर्व्हे करत असते. संस्थात्मक पातळीवर ही योजना राबविली जाते आणि त्यासाठी शासन काही रक्कम संबंधित संस्थेला वर्ग करत असते.
ही रक्कम शहरातील एका विद्यालयात वर्ग करण्यात आली होती. तेथे सहायक सेक्रेटरी म्हणून काम पाहणार्याने ही रक्कम तक्रारदारांला देण्यासाठी किंवा त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी 20 टक्क्याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने सायंकाळी संबंधित शाळेत सापळा रचला.
या सापळ्यावेळी लाच घेणार्यांशी तक्रारदाराने केलेल्या चर्चेनुसार असे ठरले, की दोन लाख रुपये देतो; पण 50 हजार आत्ता आणि दीड लाख नंतर देतो, असे निर्धारित करण्यात आले. त्यानुसार आरोपींनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले. त्या क्षणी आरोपींना नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले.
याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.