

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवा, तसेच सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि. 24) ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून
चौथा उलटूनही अधिकार्यांनी आंदोलनाची दखल भेट न दिल्याने शुक्रवारी (दि. 28) पाझर तलावातील पाण्यात उड्या मारल्याने प्रशासनाची एकच धांदल उडाली.
या आंदोलनाची माहिती मिळताच शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले. मात्र, धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
गोळेगाव तलावाची उंची वाढवा, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकर्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या यादीत गोळेगावचा समावेश करावा. शेतकर्यांना विहिरींचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थ दहा वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अद्यापि हा प्रश्न मागी न लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हा तलावाचा प्रश्न मार्गी न लागल्यास पाझर तलावात जलसमाधी घेणार असल्याचे झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे यांनी दोन दिवसापूर्वी प्रशासनाला इशारा
दिला होता. प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी तलावात उड्या मारल्याने प्रशासनची तारांबळ उडाली. पाच तास आंदोलक तलावातील पाण्यात होते. तहसीलदार प्रशांत सांगडे, शेवगावचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे, जलसंपदा विभागाचे उप अभियंता रुपनर, ग्रामसेवक उद्धव जाधोर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या भावना वरिष्ठांकडे कळवून हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात संजय आंधळे, भुजंग आंधळे, नवनाथ फुंदे, बुवासाहेब फुंदे, अमोल वावरे, संदीप फुंचे, शंकर फुंदे, नवनाथ रासनकर, सचिन फुंदे, अजिनाथ आंधळे, केशव बडे, नवनाथ बर्डे, महादेव बडे, अर्जुन आंधळे, रामराव सानप, असलम शेख, बंडू आंधळे, बबन पवार, अनिल कुंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
डोंगर परिसरातील गोळेगावच्या पाझर तलावाची साठवण क्षमता वाढविल्यास ते मिनी भंडारदरा धरण होऊ शकते. यापूर्वी सरकारकडे पाठपुरावा करूनही हे काम राजकीय श्रेय वादात मागे पडले. भूजल सर्वेक्षण विभागाने गोळेगावचा समावेश अंशतः शोषितमध्ये केला. या गावांचे सर्वेक्षण कार्यालयात बसून केले.
संजय आंधळे, अध्यक्ष, झाड फाउंडेशन