

Rohit Pawar latest news जामखेड : अडवाअडवीचे काम करत नाही; पण अलीकडे माझ्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणलेला निधी अडवण्याचा, मंजूर केलेली कामे थांबवण्याचा, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आणि फोडाफोडी करण्याचा व्हायरस पसरतोय. त्यावर निष्णात राजकीय डॉक्टर म्हणून अजितदादा तुम्हीच योग्य इलाज कराल, असा चिमटा आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे काढला.
कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक फुटल्यानंतर पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. या घडामोडी घडविण्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा हात असल्याची चर्चा खुलेआम होत आहे. त्यातच गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आले होते. त्यांची येथे सभाही झाली. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार गटाने त्यांच्या स्वागताचे फलकही लावले होते. त्याबाबत चर्चा करताना आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांचे नाव न घेता वरील शब्दांत चिमटा काढला.