कर फेक कॉल अन् वाढव किलोमीटर! ; अधिकार्‍यांचा अजब सल्ला

‘ती ऑडिओ क्लीप’ ‘पुढारी’च्या हाती
Ambulance
रुग्णवाहिकाpudhari photo
Published on
Updated on

नगर तालुका : शासनाच्या पैशाची लूट करण्यासंदर्भात ‘मोला’चे मार्गदर्शन करणारी वरिष्ठ अधिकार्‍यांची ऑडिओ क्लीप ‘पुढारी’च्या हाती लागली आहे. त्यात हे अधिकारीच 108 रुग्णवाहिका चालकाला अजब सल्ला देत असल्याचे ऐकावयास येते. 108 क्रमांकाने चालणारी रुग्णसेवा ‘असून अडचण नसून खोळंबा’ झाल्याने सेवेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जेऊर ग्रामपंचायतीने 108 रुग्णवाहिका व्यवस्थेची संपूर्ण माहिती मागविण्याचा ठराव केला असून माहिती प्राप्त होताच पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात आले.

‘आपत्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी’ हे ब्रीदवाक्य घेऊन रुग्णसेवेसाठी ‘108’ रुग्णवाहिका सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाली. परंतु याच रुग्णवाहिकेच्या नगर तालुक्यातील यंत्रणेला ‘घरघर’ लागल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रकाशित करताच यंत्रणा खडबडून जागी झाली. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. वारंवार रुग्णवाहिका पुणे कॉलवर पाठविल्या जातात. याचबरोबर व्यवस्थापनात मोठा गोंधळ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालय, केडगाव, भिंगार, जेऊर, रुईछत्तीसी अन् चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालय या सहा ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. रुग्णवाहिकेवर सेवेसाठी बारा चालक तर 13 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र अनेकदा नाईट शिफ्टला डॉक्टरच उपलब्ध नसतात. अशा वेळी ती रुग्णवाहिका स्टॅन्ड बाय असली पाहिजे, पण चालक फेक कॉल करून किलोमीटर वाढवीत असल्याचे समोर येत आहे. त्यातून शासनाच्या पैशाची लूट सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

रुग्णवाहिकेची गरज असताना गाडी ‘स्पॉटवर’ उभी असून देखील रुग्णांना सेवा मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाबाबत तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेऊर ग्रामसभेत तालुक्यातील सर्व 108 रुग्णवाहिकेबद्दल माहिती अधिकारात संपूर्ण माहिती मागून दोषींवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेण्यात आला आहे. 108 रुग्णवाहिकेतील गलथान कारभाराचे सर्व पुरावे वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. अन्यथा या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती एका ग्रामपंचायत सदस्याने दिली.

शहरासह तालुक्यातील रुग्णवाहिकेने केलेले एकूण कॉल, पुणे कॉल, पेशंटची नावे, नंबर, डॉक्टर तसेच चालकांचे हजेरी रजिस्टर, अदा केलेले वेतन, इतर खर्च याबाबतची संपूर्ण माहिती ठराव घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे संबंधित ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सांगितले. डॉक्टर व चालकांच्या नियुक्तीबाबत वास्तव परिस्थिती व व्यवस्थापनाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती यात मोठी तफावत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतच करणार पर्दाफाश

जेऊर येथील रुग्णवाहिकेवर सुमारे दोन वर्षांपासून रात्रपाळीसाठी डॉक्टरच उपलब्ध नाहीत. तसेच अनेक वेळेस दिवसाही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला आहे. तरीदेखील रुग्णवाहिकेवर चालकांचे वेतन तसेच मेंटेनन्स खर्च व इतर खर्च हा वायफळ गेलेला आहे. तसेच जेऊर येथील रुग्णवाहिकेवर नियुक्तीस असणारे डॉक्टर व चालक यांना वेतन अदा करण्यात आल्यास त्याचीही माहिती घेण्यात येणार आहे. वायफाट गेलेल्या खर्चास जबाबदार कोण? याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांकडून पुढाकार घेण्यात येणार आहे..

‘त्या’ ऑडिओ क्लिपची चर्चा!

व्यवस्थापनातील सावळ्या गोंधळाबाबत एकाकडे असलेली ऑडिओ क्लिप चर्चेत आली आहे. त्यातील संभाषणातून व्यवस्थापनातील वरिष्ठांकडूनच बोगस, फेक कॉल टाकून कोणत्याही परिस्थितीत किलोमीटर वाढविण्याबाबतचे बोल ऐकू येतात. तसेच जेऊर येथे दोन डॉक्टर नियुक्तीस असल्याचीही चर्चा झाल्याची माहिती ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते.

ग्रामसभेत तालुक्यातील 108 रुग्णवाहिकेबद्दल माहिती अधिकारात संपूर्ण माहिती मागून दोषींवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेण्यात आला आहे. रुग्णवाहिकेतील गलथान कारभाराचे सर्व पुरावे वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसताना गाडी उभी करून ठेवणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता चालकांचे वेतन व मेंटेनन्सचा खर्च विनाकारण जनतेच्या पैशातून होत आहे. त्याची चौकशी करून दोषीवर कारवाई होणे गरजेचे आहे.

योगेश पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news