

नगर: गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत सरासरी 56.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला आहे. परंतु या वादळी पावसाने 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान केले आहे. जवळपास दीड हजार शेतकर्यांना आर्थिक फटका दिला आहे. या पावसाने दोन व्यक्ती दगावल्या तर दोघे जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार जून महिन्यात 108.7 मि.मी. पाऊस होणे गरजेचे आहे. या महिन्यातील 15 दिवसांचा कालावधी संपला आहे. (Latest Ahilyanagar News)
या पंधरा दिवसांत सरासरी 54.1 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना 56.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 173.7 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय श्रीगोंदा, नगर, कर्जत, शेवगाव, राहुरी, संगमनेर आदी तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वात कमी 68 टक्के पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे.
पंधरा दिवसांच्या कालावधीत झालेल्या वादळी पावसाने अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, नेवासा, शेवगाव, पाथर्डी व संगमनेर आदी तालुक्यांना झोडपून काढले आहे. या सात तालुक्यांतील 1 हजार 496 शेतकर्यांच्या 863.69 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, मका, बाजरी, आंबा, पेरु, संत्रा, डाळिंब, भुईमूग, केळी, टोमॅटो, कोबी, दोडके, शेवगा, पपई, मोसंबी आदी पिके आणि फळबागांचे नुकसान केले आहे.
1 जूनला झालेल्या पावसाने कर्जत तालुक्यातील 11 गावांना फटका दिला. या गावांतील 211 शेतकर्यांच्या 100.60 हेक्टर पिकांचे नुकसान केले. 11 जूनला झालेल्या वादळी पावसाने 97 गावांतील 995 शेतकर्यांचे 587.14 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबांगा मातीमोल केल्या आहेत.
12 जून रोजी झालेल्या पावसाने 45 गावांतील 290 शेतकर्यांना आर्थिक फटका दिला आहे. या शेतकर्यांचे 175.55 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांत 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले सर्वाधिक नुकसानीचा फटका नेवासा तालुक्याला बसला आहे.
पाऊस मिलिमीटरमध्ये
नगर : 55.2, पारनेर : 86.8, श्रीगोंदा : 71.8, कर्जत :63.6, जामखेड : 50.3, शेवगाव :62.4, पाथर्डी :41.2, नेवासा : 40.7, राहुरी :70.8, संगमनेर : 53.3, अकोले : 43.6, कोपरगाव : 41.9, श्रीरामपूर : 42.9, राहाता : 45.2.
नुकसान
नेवासा : 391.5 कर्जत : 237.84 शेवगाव : 199.8
पाथर्डी : 19.4
नगर : 6.40 जामखेड : 5
संगमनेर : 3.35