

राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंब्याच्या लिलावातून विद्यापीठाला यंदा विक्रमी 71 लाखांचे उत्पन्न मिळाले. महाटेंडर प्रणालीद्वारे हा लिलाव झाला. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेमध्ये 3071 इतकी उत्पादनक्षम झाडे आहेत.केशर, लंगडा, हापुस, वनराज, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मल्लीका, दुधपेडा, निलम, आम्रपाली, पायरी या वाणांची फळझाडे आहेत.
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत आंब्यापासून मिळणार्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. विद्यापीठातील आंबा चव व गुणवत्तेसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. त्यामुळे यंदा विद्यापीठातील आंबा फळबागा घेण्यासाठी व्यापार्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हवामानाची मिळालेली साथ व उद्यान विभागाने मोहराचे केलेले सुयोग्य व्यवस्थापनामुळे यंदा उच्चांकी उत्पन्न मिळाले.
विद्यापीठातील आंबा बागांचे तांत्रीक व शास्त्रोक्त पदधतीने बारमाही व्यवस्थापन केले जाते. कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि उद्यानविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांचे मार्गदर्शन आणि उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर यांच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे यंदा फळधारणा दुप्पट झाली असून मागील दहा वर्षाचा उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे.
चार वर्षात चारपट वाढ
उद्यानविद्या प्रक्षेत्रावरील आंबा फळबाग महसुलामध्ये दरवर्षी वाढ होत असून मागील चार वर्षात जवळपास त्यामध्ये चारपट वाढ झालेली आहे. यंदा आंबा फळबागांच्या ई-लिलावाने उच्चांक गाठत सर्वोत्तम दर मिळवुन दिला. डॉ. सचिन मगर, विजय पवार, राहुल पाटील, वसंत बाचकर, बाबासाहेब होडगर, सचिन शेळके, रमेश अनाप, पुंजाहरी बाचकर, दिपक पवार यांनी विशेष परीश्रम घेतल्याचे हे फळ मानले जाते.