एका 69 वर्षीय वृद्धाने सुमारे एक तास बिबट्याशी झुंज दिल्याची घटना आपण फक्त एखाद्या चित्रपटात पाहीली असेल. मात्र प्रत्यक्षात राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे ही घटना घडलीय. खंडेराव शेटे या वद्धाने चक्क बिबट्याशी झुंज देऊन स्वतःचा जीव वाचवला.
खंडेराव मुरलीधर शेटे, (वय 69 वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती व्यवसाय करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खंडेराव शेटे हे दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजे दरम्यान गोटूंबे आखाडा परिसरातील त्यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. ते पिकाला पाणी देत असताना शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आणि त्यांच्या हात जबड्यात धरुन ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या वृद्धाने तरुणाला लाजवेल असे धाडस करुन बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी खंडेराव यांनी दगड, काठी जे हातात येईल त्याने बिबट्यावर प्रहार केले. त्यांची बिबट्या बरोबरची ही झुंज सुमारे एक तास सुरु होती. यात खंडेराव शेटे हे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. दरम्यान त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील काही शेतकरी जमा झाले. त्यांनी बिबट्याला दगड गोटे मारल्याने तो ऊसात पळून गेला. तेव्हा जखमी झालेले खंडेराव शेटे यांना काही जणांनी रुग्णालयात नेऊन दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून खंडेराव शेटे यांच्यावर राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीला घडलेला सर्व प्रकार सांगीतला.