Ahilyanagar : अकोल्यात 574 बालके कुपोषित; 29 बालकांना दुर्धर आजार

कुपोषणमुक्तीच्या सरकारी योजना कागदावरच; आरोग्य व बालकल्याण विभागाचे दुर्लक्ष
Malnourished Child
अकोल्यात 574 बालके कुपोषितfile photo
Published on
Updated on

राजेंद्र जाधव

अकोले : राज्य सरकार बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे; मात्र अकोले तालुक्यात शासकीय वैद्यकीय आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग कुपोषणमुक्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात तालुक्यात सॅम 82 आणि मॅम 492 कुपोषित बालके आणि दुर्धर आजाराची 29 बालके आढळून आल्याची धक्कादायक बाब शासनाला पाठविलेल्या अहवालातून समोर आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनल्याचेच हे द्योतक मानले जात आहे.

कुपोषणमुक्तीसाठी शासन दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी गरोदर महिला व बालकांवर खर्च करते. मात्र तो खर्च व्यर्थ झाल्याचे उघड होत आहे. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळून आल्याचा अहवाल बालकल्याण प्रकल्प अधिकार्‍यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविला आहे.

राजूर बालकल्याण प्रकल्प कार्यालयात सँम(अति तिव्र कमी वजनाचे) 47 व मँम (मध्यम तिव्र कमी वजनाचे) 278 कुपोषित बालकांची नोंद झाली असुन दुर्धर आजार 13 बालकांची नोंद झाली आहे. तर अकोले बालकल्याण प्रकल्प कार्यालयात सँम(अति तिव्र कमी वजनाचे) 35 आणि मँम (मध्यम तिव्र कमी वजनाचे) 214 कुपोषित बालके आणि दुर्धर आजार 16 बालकांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

त्यामुळे आदिवासी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच जन्मतःच दुर्धर आजार, हृदयविकार, कावीळ, न्यूमोनिया, दमा, श्वासावरोध, कमी वजन, कमी दिवसांचे बालक, जन्मतः व्यंग यांसारख्या विविध कारणांनी 0 ते 6 वर्षांच्या बालकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो. सुदृढ बालक जन्माला यावे आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गर्भवती मातांना सकस आहार दिला जातो. अकोले तालुका आरोग्य विभाग आणि राजूर व अकोले बालकल्याण प्रकल्प दर वर्षी लाखो रुपये खर्च करते; पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही कुपोषणाची वाढती आकडेवारी रोखण्यात आरोग्य व महिला बालकल्याण विभाग अपयशी ठरत आहेत.

अकोले तालुक्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या राजूर व अकोले या दोन महिला बालकल्याण प्रकल्पांतर्गत 587 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर, स्तनदा माता व बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्यपुरवठा करणे, तसेच 3 ते 6 वर्षे वयाच्या बालकांना ताजा आहार, गरोदर व स्तनदा मातांना तसेच 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी यांसारखे पौष्टिक खाद्य देऊन त्यांचे वजन, उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडी सेविकांमार्फत होणे आवश्यक आहे. ते योग्यरित्या करण्यात येत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात 574 बालके कुपोषित असल्याचे उघड झाले आहे.

अकोले तालुक्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषणग्रस्त बालकांना सकस आहार दिला जात आहे. नाचणी सत्व व ईडीएनएफ हा कुपोषित बालकाच्या वजनाच्या प्रमाणे आहार दिला जातो. मल्टीमिलेट बिस्किट, पोषक कल्पवडी, प्रोटीन पावडर, कॅल्शियम औषध देण्यात येते. तसेच दर महिन्याला कुपोषित बालकांची तपासणी करून औषधोपचार केले जातात.

एम. एस. चव्हाण, प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news