

नगर: अकोले तालुक्यातील आरोग्य विभागात झालेल्या चार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी संतोष वामन घुले यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले.
या आदेशाने लेखा विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वरिष्ठांना अभय देताना कर्मचार्याचा प्रशासकीय बळी गेल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण जबाबदार आहेत याची चौकशी होणार का याकडे लक्ष आहे. (Latest Ahilyanagar News)
अकोले पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभागातील घोटाळ्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे एका व्यक्तीने तक्रार केली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशीचे आदेश दिले, कॅफो शैलेश मोरे यांनी चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालात अडीच ते चार कोटींचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
प्रशासनाकडून या प्रकरणात 56 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांच्याकडून वसुलीवर भर देण्यात आला. यापैकी साधारणतः दीड कोटीची वसुली झाली. मात्र उर्वरित रक्कम अद्याप प्राप्त नाही. 56 पैकी 54 जणांनी खुलासे दिले आहेत. दरम्यान, या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर या प्रकरणात संबंधित दोषी कर्मचार्यांसोबतच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी घुले यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे.
ज्या अर्थी संतोष वामन घुले, कनिष्ठ लेखाधिकारी, हे नगर येथील जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात कार्यरत असताना त्यांना नेमून दिलेल कामकाजात अक्षम्य हलगर्जिपणा केला आहे. आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी, मवेशी व ब्राम्हणवाडा ता. अकोले तसेच पंचायत समिती अकोले येथे मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे. या अपहारास घुले हे जबाबदार असलेचे निदर्शनास आलेले आहे. सदर बाब ही कार्यालयीन शिस्तीचे उल्लघंन करणारी आहे.
घुले हे जिल्हा परिषद कर्मचारी असून, त्यांनी सदैव निरपवाद, सचोटीने व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे. तथापि कर्तव्याचे पालन न करुन गैरवर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग झालेला आहे. त्यामुळे संतोष घुले यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश सीईओ भंडारी यांनी काढले आहेत.