

नगर : पावसाळ्यात अतिवृष्टी, ढगफुटी, धरणांतून सोडलेला विसर्ग, नदीपात्रांतील अतिक्रमण आदींमुळे जिल्ह्यातून वाहणार्या नद्यांना पूर आल्यास 223 पूरप्रवण गावांना फटका बसतो. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जनतेच्या सुरक्षतेसाठी तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 500 स्वयंसेवकांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय सात इन्फ्लॅटेबल रबर बोटी व 50 रॅपलिंग रोप आदींसह विविध साहित्य सामुग्रीची व्यवस्था केली आहे. (Ahilyanagar News Update)
जिल्ह्यात गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, घोड, सीना आदी नद्या वाहत आहेत. या नद्यांना पूर आल्यास काठावरील 223 गावांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. या गावांतील जनतेचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून 500 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी 500 लाईफ जॅकेट, 150 लाईफ बोया, 12 सर्च लाईट, 14 स्ट्रेचर, 12 पोर्टेबल टेन्ट, 6 फर्स्ट एड कीट, 14 अस्का लाईट, 30 सेफ्टी हेल्मेट आणि 50 रॅपलिंग रोप आदी आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामुग्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पूरग्रस्तांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. कोणत्या ठिकाणी पाऊस झाला याची माहिती होण्यासाठी 131 महसूल मंडलांपैकी 124 मंडळांत महावेध प्रकल्पातंर्गत ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी येथे भिमा नदीपात्रात 40 हजार क्यूसेकपेक्षा अधिक विसर्ग आल्यास आर्वी बेटास पाण्याचा वेढा पडतो. या बेटाचा परिसर 400 एकराचा असून, तेथे 150 व्यक्ती वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी औषधांचा आणि अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवला जातो. या ठिकाणी इन्फ्लॅटेबल रबर बोट उपलब्ध करुन दिली आहे. येथील स्थानिक तरुणांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या बोटीचा वापर करून दळणवळण केले जात आहे.
या ठिकाणी इन्फ्लॅटेबल रबरी बोटी
नगर महापालिका : 1, पोलिस मुख्यालय : 1, कोपरगाव, श्रीरामपूर व राहुरी नगरपालिकांकडे प्रत्येकी 1, कर्जत तहसील (सिद्धटेक) : 1, श्रीगोंदा तहसील (आर्वी) : 1.