Gram Panchayat Elections: 108 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे गुरुवारी आरक्षण
पाथर्डी तालुका: तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची फेरसोडत गुरुवारी (दि. 24) पार पडणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया तहसील कार्यालयाते आयोजित करण्यात आली असून, यामध्ये 2025 ते 2030 या कार्यकालासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी दिली.
आरक्षण प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असून, दुपारी 12 वा. सरपंचपदाच्या आरक्षणासाठी विशेष सभा, तर दुपारी 1 वा. महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही सभांचे आयोजन 2011 च्या जनगणनेच्या आधारे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे. (Latest Ahilyanagar News)
एकूण ग्रामपंचायती 108 असून, अनुसूचित जाती : 8 सरपंचपदे (त्यापैकी 4 महिला), अनुसूचित जमाती : 2 सरपंचपदे (1 महिला, 1 पुरुष), इतर मागास प्रवर्ग : 29 सरपंचपदे (त्यात 15 महिला), सर्वसाधारण प्रवर्ग : 67 सरपंचपदे (त्यात 35 महिला) यापैकी एकूण 55 सरपंचपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व बळकट होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक न्यायाच्या तत्वांची अंमलबजावणी होणार असून समाजातील सर्व घटकांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे.
तहसीलदार डॉ. उद्धव नाईक म्हणाले की, चुंभळी, शंकरवाडी, टाकळी मानूर व अंबिकानगर या चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार नाही. कारण विधानसभा निवडणुका पार पडूनही या गावांच्या निवडणुका अद्याप घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या गावांना यंदाच्या आरक्षण सोडतीतून वगळण्यात आले आहे.
विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक राहणार असून, महिला आरक्षणाच्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते असणार आहेत. या दोन्ही सोडत प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. नाईक यांनी केले आहे.

