जळगाव: चाळीसगाव येथील लग्नातून दागिने चोरणारा तीन तासांत अटक | पुढारी

जळगाव: चाळीसगाव येथील लग्नातून दागिने चोरणारा तीन तासांत अटक

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यामध्ये बाहेरील राज्यातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चाळीसगाव शहरात एका लग्न समारंभामध्ये महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल लांबविणाऱ्या मध्यप्रदेश मधील संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी कोदगाव चौफुलीवर मुद्देमालासह तीन तासांत अटक केली.

बालवीर माखन सिसोदिया (वय १९, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील सरोज मुकुंद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न समारंभ गुरूवारी (दि. ७) होता. यावेळी सरोज देशपांडे यांच्याकडे असलेले नवरीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, किंमती मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला होता. ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडली होती.

याप्रकरणी सरोज देशपांडे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याच्या आधारे कोदगाव चौफुलीवर सापळा रचून बालवीर सिसोदिया याला मुद्देमालासह अवघ्या तीन तासांत अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, दीपक पाटील, नंदु महाजन, अजय पाटील, राहुल सोनवणे, विनोद खैरनार, रविंद्र बच्छे, आशुतोष सोनवणे, नितीन वाल्हे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button