धुळे : अवकाळीतील नुकसानग्रस्तांना दिलासा, नुकसान भरपाईसाठी मदत प्रक्रीया सुरु | पुढारी

धुळे : अवकाळीतील नुकसानग्रस्तांना दिलासा, नुकसान भरपाईसाठी मदत प्रक्रीया सुरु

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला. गारपीट,अतिवृष्टी,अवकाळी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी अधिवेनशनात तारांकीत प्रश्‍नाव्दारे केली आहे.दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी सदर प्रश्‍न विचारल्यामुळे मदत प्रक्रीयेला वेग आला आहे,परिणामी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबरोबरच विकासाला चालना मिळेल अशा प्रश्‍नांवर आवाज उठविला आहे. एप्रिल-मे 2023 या महिन्यात धुळे तालुक्यासह जिल्हयात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरीत भरपाई मिळावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी अधिवेशनाचे औचित्य साधून तारांकीत प्रश्‍ना नुसार शेतकर्‍यांचे गार्‍हाणे मांडले. आपल्या तारांकीत प्रश्‍नात आ.कुणाल पाटील यांनी म्हटले आहे कि, धुळे तालुक्यात एप्रिल-मे 2023 या महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कांदा,ज्वारी,लिंबू,पपई,टरबूज यासह उन्हाळी पिकांना अवकाळीचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. वादळी पावसामुळे जिवीत हानीही झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी करीत पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचा आवाज विधानभवनात बुलंद केला.

आ. कुणाल पाटील यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्‍नाला मदत आणि पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, अवकाळी पाऊस आणि गारपीठ तसे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून प्रशासकीय पातळीवर वेगाने काम सुरु आहे.नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना थेट हस्तांतरण प्रणालीव्दारे मदतीची रक्कम देण्यात येणार आहे. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानीबाबत विधानभवनात आवाज उठविल्यामुळे नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत प्रक्रीयेला गती मिळणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button