प्रतीपंढरपूर देवरगावला लोटला हजारोंचा जनसागर; विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत भाविकांनी अनुभवला रिंगण सोहळा | पुढारी

प्रतीपंढरपूर देवरगावला लोटला हजारोंचा जनसागर; विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत भाविकांनी अनुभवला रिंगण सोहळा

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठलाचे नाम, सुशोभित रथातून विठ्ठलाची निघालेली भव्य मिरवणूक, पालखी समोर महिला – पुरुषांचे लोटांगण, लेझीमचे नृत्य, रथाच्या स्वागतासाठी भाविक भक्तांनी गावातील रस्त्यांवर काढलेली आकर्षक रांगोळी अन फुलांचा, अन पावसाचा वर्षाव अशा भक्तिमय वातावरणात चांदवड तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देवरगावात आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत रिंगण सोहळा हजारो भाविक भक्तांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला.

तालुक्यातील देवरगाव येथे असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीला हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळच्या वेळी वैकुंठवासी हरेकृष्ण बाबाचे शिष्य सुजीत महाराज यांच्या हस्ते पिंपळधाम येथे सकाळी सात वाजता आरती, ९ ते १२ वाजे दरम्यान सत्संगचा कार्यक्रम झाला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीच्या जय घोषाने संपूर्ण गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखी समोर महिलांनी व पुरुषांनी लोटांगण घेत विठ्ठलाप्रती असलेल्या भक्तीचे दर्शन घडले. या पालखीच्या स्वागतासाठी गावातील सर्व भाविकांनी रस्त्यांवर विविध रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. पालखी मिरवणूक संपल्यावर पालखीचे येथील जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. यानंतर शाळेच्या पटांगणावर रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा याची देही याची डोहळा पाहण्यासाठी देवरगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. शाळेत रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर पटांगणावर विठ्ठलाची सामुहिक आरती करण्यात आली. आरती झाल्यावर पालखी पुन्हा मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. मंदिरात पालखी पोहचल्यावर मिरवणुकीची सांगता झाली.

Back to top button