नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

मालेगाव ; पुढारी वृत्तसेवा : गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होण्यापासून अभय देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. शहरातील किल्ला पोलिस ठाण्यातील कर्मचारी तानाजी मोहन कापसे (वय ४२) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करणे व पुढील कारवाईत मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे कापसे यांनी तीन हजार रुपयांची बुधवारी मागणी केली. संबंधिताने तत्काळ लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने सापळा रचला. त्यात पंचासमक्ष कापसे यांनी तीन हजार रुपये स्वीकारले. यानंतर तात्काळ त्यास ताब्यात घेण्यात येऊन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक प्रवीण महाजन, प्रणय इंगळे, संदीप बत्तीसे, परशुराम जाधव यांचा पथकात समावेश होता.