नंदुरबार हादरले! एकाच झाडावर दोन तरुणांचे मृतदेह आढळले | पुढारी

नंदुरबार हादरले! एकाच झाडावर दोन तरुणांचे मृतदेह आढळले

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा : जंगलात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेले आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. दोन्ही मृतदेह कुजलेले असल्यामुळे घटना घडून बराच कालावधी उलटल्याचे स्पष्ट दिसत असून, ही आत्महत्या आहे की घातपात, याचा संदर्भ पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरूवार) सकाळी शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात डोंगरा लगतच्या जंगल भागात एका झाडावर दोन युवकांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली. ती माहिती त्यांनी तातडीने शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बुधवंत यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन आनोळखी युवक ठिबक सिंचनच्या एकाच नळीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.

त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी ओळख पटवून देणारे कागद अथवा मोबाईल वगैरे काही सापडले नसल्याचे सांगण्यात आले. गावातल्या लोकांनाही ओळख पटलेली नाही. यामुळे हे दोन्ही तरुण कोण? कोणत्या गावाचे आहेत? इकडे आडरानात कसे आले? त्यांनी एकत्र गळफास घेतला की दिला गेला? असे अनेक प्रश्नन उपस्थित झाले आहेत. दरम्यान शहादा पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. जाहीर केलेल्या वर्णनात म्हटले आहे की, एकाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, जिन्स पँट, पायात काळी चप्पल व दूसरा युवक सावळ्या रंगाचा, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळी जिंन्स पायामध्ये निळा बुट आहे.

Back to top button