Dhule Crime : पोलिसांना मारहाण करत पळालेल्या परप्रांतीय गुन्‍हेगारांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडले | पुढारी

Dhule Crime : पोलिसांना मारहाण करत पळालेल्या परप्रांतीय गुन्‍हेगारांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडले

धुळे ; पुढारी वृत्तसेवा : पोलिस व जनता यांच्यात समन्वय असल्यास गुन्हा व गुन्हेगार यांच्यावर कारवाई करणे अशक्य नसते, याचा प्रत्यय धुळ्यात आला आहे. (Dhule Crime) पोलीस पथकावर हल्ला करून पसार झालेल्या दोघा कुख्यात गुन्हेगारांना नागरिकांच्या मदतीने बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जागरूकता दाखवून या गुन्हेगारांची व्हिडीओ क्लिप तयार केल्याने पसार गुन्हेगार गजाआड झाले आहेत. या नागरिकांचा गौरव होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील व अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

Dhule Crime : पोलिसांना मारहाण करत पळाले

पंजाब राज्यात राहणारे नवप्रीतसिंह तारेसिंह उर्फ मनदीपसिंह सुरजितसिंग जाट आणि मोहित ऊर्फ मनी विजय शर्मा या दोघांवर नांदेड येथून दुचाकी चोरून नेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघा आरोपींना नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ देवके यांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलीस पथक या आरोपींना नागपूर सुरत महामार्गे धुळ्याच्या हद्दीतून जात होते. पोलीस व्हॅन धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात पोहोचली. यावेळी दोघा आरोपींनी गाडीत असलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढवला. या आरोपींनी हातात असलेल्या बेड्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर वार केल्यामुळे  पोलीस जखमी झाले.

यानंतर बेड्या तोडून दोघा आरोपींनी गाडीच्या बाहेर उडी मारून शेतातुन अंधाराचा फायदा घेऊन पळाले. या घटनेनंतर पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर ही माहिती तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात यश

ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवत, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच सोनगीर पोलिसांनी तपास पथके या भागात रवाना केली होती. हे दोघेही आरोपी निमडाळे परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र जंगलात शोध करून देखील या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. अखेर पोलिसांनी धुळे तालुक्यातील गावांमध्ये या आरोपींचे फोटो व्हायरल केले. तसेच गावातील पोलिस पाटील, सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या आरोपींची माहिती दिली.

त्यानुसार आज लामकानी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना दोन संशयित व्यक्ती या भागात फिरत असल्याचे दिसून आले. लामकानी येथील भरत वाघ, सुदाम माळी, सोनू माळी, पोलीस पाटील नितीन महाले आणि काही युवकांनी या संशयितांची एक क्लिप तयार करून ती पोलिसांना पाठवली यानंतर पोलिसांनी या आरोपींची खात्री केल्यानंतर दोघा गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची सूचना केली.

याच दरम्यान सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या आरोपींना ताब्यात घेतल्याने पुढीलअनर्थ टळला आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळालेले हे दोघे आरोपी १७ डिसेंबर पासून धुळे तालुक्यातील जंगलात भटकत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

या दोघा आरोपींवर धुळे शहर व तालुका, नांदेड विमानतळ पोलीस ठाणे, गुजरात ,जालना, अहमदनगर त्याचप्रमाणे मनमाड शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button