जळगाव जिल्हा बँक निवडणूक : गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा | पुढारी

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

घरकुल घोटाळा प्रकरणी पाच वर्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना शिक्षा झाली असल्याने, जिल्हा बँक निवडणूक लढवण्यास त्यांना मज्जाव केला जावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याने देवकर यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना, जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘त्या’ गैरसमजामुळे यश आणि नेहा एकमेकांपासून कायमचं दुरावणार

सध्याच्या नियमानुसार एखाद्याला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. मात्र मध्यंतरी देवकरांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असताना त्यांच्या विरोधात उभे असणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी, सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच याबाबत पवन ठाकूर यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. आज न्यायालयाने काम झाल्यानंतर पुढील दाखल याचिकेच्या सुनवाईसाठी २२ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.

आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती देवून, पुढील तारीख दिल्याने ते जिल्हा बँकेची निवडणूक लढवू शकतात असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे आता गुलाबराव देवकर यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ते महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, बँकेच्या चेअरमनपदासाठी त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. यातच आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button