नाशिक : वडगाव पंगू गावात मोकाट कुत्र्यापासून हरणाच्या पाडसाची सुटका | पुढारी

नाशिक : वडगाव पंगू गावात मोकाट कुत्र्यापासून हरणाच्या पाडसाची सुटका

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वडगाव पंगू गावच्या शिवारात हरणाच्या कळपातील एक लहान हरणाच्या पाडसाची सुटका मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून करण्यात सामाजीक कार्यकर्ते भागवत झालटे व नागरिकांना यश आले. या मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच वाकी खुर्द येथे मोरावर हल्ला केला होता. या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील वडगाव पंगु येथील सोसायटीचे चेअरमन नवनाथ सूर्यभान गोजरे यांच्या शेतात आज (दि.१) रोजी हरणांच्या कळपामागे मोकाट कुत्रे लागले होते. त्यात एक लहान हरणाच्या पाडसाला कुत्र्यांनी घेरल्याने त्यांची गोजरे कुटुंबीयांनी सुटका केली. या हल्ल्यात हरणाच पाडस बेशुद्ध पडले होते. यावेळी शेतकरी गोजरे यांनी समाजसेवक भागवत झालटे यांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी झाल्टे यांनी घटनास्थळी पोहचून हरण पडसाला दूध व पाणी पाजले. त्यांनतर काही वेळाने हरणाच पाडस शुध्दीवर आले. यावेळी येवला वनरक्षक सोनाली वाघ, अंकुश गुंजाळ यांनी घटनास्थळी पोहचून पडसाला ताब्यात घेत तालुक्यातील वागदर्डी येथे वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले त्यावेळी वन कर्मचारी अंकुश गुंजाळ, समाजसेवक भाऊसाहेब झाल्टे, किरण बोरसे उपस्थित होते.

Back to top button