

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. आता या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार होता. मात्र, अचानक तिसरा साथीदार आल्याने मंत्रिमंडळात त्यांचाही वाटा वाढला आहे. त्यामुळे नाराजी तर होणारच, मात्र मुख्यमंत्र्यांनी समजूत घालून ती दूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांचे जळगावात आगमन झाले. अमळनेरकडे जाताना त्यांनी मार्गात पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या भेटीसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, अनिल पाटील जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतील, अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांनाही मंत्रीपद देण्यात आले. यामुळे थोडी फार नाराजी तर राहणारच आहे. काही जणांना मंत्रीपद मिळणार होते, मात्र अचानक आता तिसरा वाटेकरी आल्यामुळे नाराजी (Gulabrao Patil) आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पाटील म्हणाले की, "ते दोघे एकत्र येतील किंवा नाही येणार, हे पंचांग बघून सांगावे लागेल. या चर्चा आहेत, मागच्या काळात आम्ही असताना सुद्धा दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, अशी हाक दिली होती. मात्र एकत्र येण्याचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, दोघे जर एकत्र येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पुढचा मंत्रीमंडळ विस्तार १० जुलैरोजी होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले, सध्या आम्ही ४४ प्लस आहोत. हा आकडा वाढत जाईल, मला तर वाटते राष्ट्रवादीचे सर्वच आमदार आमच्याकडे येतील. तुर्तास आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. स्वप्नातही मंत्री होईल, हा विचार मी केला नव्हता. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी आई शेतात निंदायला गेली होती. मला काहीएक माहिती नव्हते. अपेक्षा तर अजिबातच नव्हती. अजित पवारांवर निष्णात प्रेम करणे, त्या माणसामुळे जे जीवनदान मिळाले आहे, त्याची परतफेड करणे, एवढाच उद्देश होता. पण मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला, त्यावेळी अचानकपणे सांगण्यात आले की, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. त्यामुळे धक्काच बसला, अशी भावना मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा