नाशिक: वाघदर्डी धरणावर तरुणींवर हल्ला करणाऱ्यास अटक | पुढारी

नाशिक: वाघदर्डी धरणावर तरुणींवर हल्ला करणाऱ्यास अटक

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील वाघदर्डी दोन तरुणींवर हल्ला करीत मोबाईल लुटणाऱ्या दोघा भामट्यांपैकी एका संशयितास अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. तर एक संशयित अद्यापही फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अटक केलेल्या संशयिताची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.

मनमाड येथील काजल अरुण निकाळे (२८, रा. पंचवटी कॉलनी, रेल्वे कॉर्टर पाण्याच्या टाकीजवळ, मनमाड) व तिची नातेवाईक श्वेताली संजय कांबळे या दोघी ६ जून रोजी मोटरसायकलने वागदर्डी धरण परिसरात फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी काजल व श्वेताली यांची विचारपूस करत एकाने त्यांच्या हातातील गलोरने काजलच्या नाकाजवळ मारून तिला दुखापत केली. त्यानंतर दुसऱ्याने श्वेताली हिच्या डाव्या काना जवळ व खांद्यावर दगड मारून दोघींना जखमी केले. श्वेताली खाली पडल्यावर तिच्या हातातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दोघांनी दुचाकींवरून पळ काढला होता. याबाबत काजल निकाळे हिने चांदवड पोलिसात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा तपास चांदवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव करीत होते. गुन्ह्यातील आरोपी यांचे स्केच तयार करून ते वाघदर्डी धरण परिसरातील गावांमधील सोशल मीडियावर शेअर केले होते. संशयितांचे स्केच ओळखल्याने एका गुप्त बातमीदाराने चांदवड पोलिसांना त्यांची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी सापळा रचून तालुक्यातील शिंगवे गावातून भगवान गोमा पिंपळे (वय ३४) यास ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला आहे. त्यास चांदवड न्यायालयात नेले असता ३ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी दिली आहे. पोलीस हवालदार बी. डी. सांगळे, अमोल जाधव, योगेश शेवाळे, पोलीस नाईक उत्तम गोसावी, हेमंत गिलबिले, चंद्रकांत पवार आदींनी तपास केला.

हेही वाचा 

Back to top button