नंदुरबार : बसमधून शेतकऱ्याचे ४ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत | पुढारी

नंदुरबार : बसमधून शेतकऱ्याचे ४ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात कामगिरी करून दाखवल्याबद्दल कौतुक केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश बालमुकुंद शर्मा वय 42 वर्षे, मुळ रा. कावसडी ता. जिंतूर जिल्हा परभणी हल्ली मुक्काम शक्ती नगर, उधना सुरत हे मागील 12 वर्षापासून सुरत येथे अगरबत्ती व देवपुजा भंडार विक्रीच चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, परंतु कर्जामुळे त्यांचेवर गावाकडील शेत विकण्याची वेळ आली. कर्जातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी गावाकडील एक एकर शेती विक्री केली व लाख 50 हजार रुपये स्वतःच्या पँटच्या खिशात व 4 लाख रुपये बॅगेत असे एकुण 5,50,000/- रुपये घेवून दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी 07.00 वा. सुमारास परभणी येथून सुरत येथे जाण्यासाठी निघाले.

दिनांक 28/04/2023 रोजी पहाटे 06.45 वा. सुमारास नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल श्री साई सिताराम येथे राजेश शर्मा हे चहा पिण्यासाठी उतरले व परत जावून आपल्या जागेवर बसले बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग उघडून पाहिली असता बॅगेत ठेवलेले 4 लाख रुपये दिसून आले नाही. त्यांनी शोध घेतला. तेव्हा पैसे कोणी तरी चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली. शर्मा यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घडलेली घटना कष्टकरी शेतकरी बांधवाच्या भावनांशी निगडीत होती व शेती विकून आलेले पैसे चोरी झाल्यामुळे राजेश शर्मा हे पुन्हा एक वेळा मोठ्या संकटात सापडले होते. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गांभीर्याने तपास करुन कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे यांना निर्देश देवून परभणी, गुजरात, मध्य प्रदेश राज्यात पथके रवाना केले.

या पथकांनी परभणी ते नवापूर या दरम्यान ट्रॅव्हल्स ज्या ज्या ठिकाणी थांबली त्या त्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. तपासत होते. तसेच बाहेर राज्यात गेलेले पथके अशा प्रकारच्या गुन्हे पध्दतीमधील निष्पन्न आरोपीतांची माहिती काढत होते. गुन्हा दाखल 20 दिवस झाले तरी देखील कुठलाच ठावठिकाणा लागत नव्हता.

तथापि मागील सुमारे 20 ते 25 दिवसापूर्वी नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल श्री साई सिताराम येथील ट्रॅव्हल्समधून चोरी करणारा चोरटा हा मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्याचा आहे अशी खबर मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्हयातून आरीफ कालू खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले . उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.

फिर्यादी राजेश शर्मा यांना सदर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली व त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे करुन दाखविल्याने राजेश शर्मा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु निघाले. चोरी झालेले 4 लाख रुपये हस्तगत करून आरोपीतास बेड्या ठोकल्यामुळे त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्र संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, महेंद्र नगराळे पोलीस नाईक जितेंद्र ठाकुर, पोलीस अंमलदार अभय राजपुत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, पोलीस नाईक विनोद पराडके यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button