Nashik : महामार्गाचे कठडे तोडून पिकअप थेट रेल्वेट्रॅकवर आदळली | पुढारी

Nashik : महामार्गाचे कठडे तोडून पिकअप थेट रेल्वेट्रॅकवर आदळली

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : बोरटेंभे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर आदळल्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असुन सुदैवाने यावेळी भुसावळ इगतपुरी मेमो गाडी रेल्वे कर्मचाऱ्यांनी लाल झेंडा दाखवत थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १३) मालुंजे ता. इगतपुरी येथील पिकअप गाडी (क्र. MH15 GV4694) मुंबईहुन मालवाहतूक करुन परत येत होती. दरम्यान बोरटेंभे परीसरात ही गाडी आली असता दुपारी तीन वाजताच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही पिकअप महामार्गावरील रेल्वे पुलाचे संरक्षक कठडे तोडून थेट ३५ फुट खोल असलेल्या रेल्वे ट्रॅकवर येऊन आदळली. दरम्यान भुसावळहुन इगतपुरीकडे रेल्वे मेमो एक्सप्रेस येत होती. उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत या रेल्वेला लाल झेंडा दाखवुन थांबविल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलीस, इगतपुरी पोलीस यांनी धाव घेऊन रेल्वे ट्रॅकवरील पिकअप बाजुला केली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे कर्मचारी यांनी भुसावळ कडून येणारी रेल्वे एक्सप्रेस थांबवली नसती तर मोठी जिवीतहानी झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

Back to top button