Earthquake : गुजरात सीमावर्ती भागात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांंमध्ये भीतीचे सावट | पुढारी

Earthquake : गुजरात सीमावर्ती भागात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांंमध्ये भीतीचे सावट

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तहसिलदार सचिन मुळीक यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

तुर्कस्तान देशामध्ये झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतानाच क्षणार्धात झालेला विध्वंस व जिवितहानी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सीमावर्ती भागातील रघतविहीर, फणसपाडा, राशा या गावात शनिवारी (ता. १८) रोजी पहाटे २ वाजून २७ मिनिट यावेळी अर्धा मिनिटभर भूकंपाचा धक्का जाणवला तर दुसरा धक्का त्याच दिवशी दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी जाणवला असल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारी (ता. १९) दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान फायर उडविल्या सारखा आवाज आला, अर्धा मिनिटभर चक्कर आल्यासारखे व गरगरल्या सारखे झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मांडणी वरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज गावभर आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे बसत असल्याचे गावात अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. असे आवाज नेहमीच गावात येतात. काही वेळा घर हलल्यासारखा भास होतो. हे नेमके काय प्रकरण आहे याबाबत शासनाने चौकशी करुन नेमके भूकंपाचे हादरे आहे की दुसरं काही याबाबतीत तपास यंत्रणा राबविण्यात यावी अशी मागणी फणसपाडा, रघतविहीर, राशा ग्रामस्थांनी केली आहे.

तहसिलदार सचिन मुळीक यांनी राशा येथे भेट देऊन पाहणी करीत ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. यावेळी रघुनाथ जोपळे, शिवाजी गावित, पांडू बागुल, पांडू सालकर तलाठी चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, असे आवाज अनेक वेळा गुजरात मधील अंकलास, घोडमाळ, सिदुंबर,निरपन, दमणगंगा डॅम, वांसदा जवळील झुजू डॅम या भागात येत असतात. आज झालेल्या आवाजाची तीव्रता भूगर्भातून अधिक जाणवली. मांडणी वरील भांड्याचा आवाज येतो. जमीनीतून आवाज आल्याचे जाणवते.

अचानक आवाज झाला तर माणूस दचकून उठतो बाहेर निघून बघितले तर काहींच दिसत नाही. सर्व ग्रामस्थामद्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्रामस्थ सकाळी एकमेकांशी चर्चा करतात. नेहमीप्रमाणे कामाला लागतात. मात्र नेमका हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने करावी अशी मागणी रघतविहीर येथील महेंद्र सहारे, हिरामण सहारे, धनाजी सहारे, शिवराम सहारे, शांताबाई सहारे, जिजाबाई सहारे, पारुबाई सहारे, उंबरठाण येथील माधव पवार, सुरेश चौधरी, फणसपाडा येथील नामदेव सहारे, गुलाब पवार, काशिनाथ भोये, पुन्या भोये, उमेश सहारे, धनराज सहारे, अजय सहारे, माधव सहारे, यांनी केली जाते आहे.

Back to top button