सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार; पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोघे वाहून गेल्याची भीती | पुढारी

सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार; पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोघे वाहून गेल्याची भीती

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या उत्तरेला असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातील बंधाऱ्याचा सांडवा फुटल्याची चर्चा आहे. शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीलगतच्या झोपडपट्टी व दुकानमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
पंधरा ते वीस दुकानदारांना सिन्नर पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. खासदार पूल ओलांडताना मोटरसायकलसह दोनजण वाहून गेल्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. पुरात अनेक दुचाकी वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.
सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी, सिन्नर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी हे बचावकार्य करीत आहेत. सिन्नर तालुक्यातील दापूर, ठाणगाव, सोनंबे, कोनांबे परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देव नदीला पूर आल्यामुळे वडगाव सिन्नर-लोणारवाडीचा संपर्क तुटला आहे.

सिन्नर-घोटी मार्गावर शिव नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सिन्नर बायपास मार्गे वळविण्यात आली आहे. सरस्वती नदीवरील खासदार पूल, नवा पूल व पडक्या वेशीतील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहू लागले आहे. बाराद्वारी व नदीलगतच्या जवळपास 100 लोकांना सुरक्षितस्‍थळी हलविण्यात आले आहे. त्‍यांची राहण्याची व्यवस्था मातोश्री नर्मदा लॉन्स येथे करण्यात आली असून, त्यांच्या जेवणाची व्यवस्‍थाही करण्यात आली आहे.

आयटीआय परिसरातील छत्रपती संभाजी नगर भागातील 30 लोकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आयटीआय परिसरातील देवी मंदिरात त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याची माहिती सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी दिली. उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतकार्य केले.

Back to top button