धुळे जिल्ह्यात ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत : मंत्री दादा भुसे | पुढारी

धुळे जिल्ह्यात ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत : मंत्री दादा भुसे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंत्री भुसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यावर जिल्हा प्रशासन व फ्लाइंग क्लबच्या सहकार्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.

स्वातंत्र्याची चळवळ प्रेरणादायी

मंत्री भुसे म्हणाले, आजपासून बरोबर ७५ वर्षांपूर्वी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यासाठी भारतीयांना दीडशे वर्षे ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला. या काळात विविध आंदोलने झाली. स्वातंत्र्याच्या या यज्ञात अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. शेवटी १९४२ मध्ये ब्रिटिशांना ‘चले जाव’ करावे लागले. त्यानंतर १९४७ मध्ये आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला मिळालेले स्वातंत्र्य केवळ भारतासाठी नव्हते, तर तिसऱ्या जगातील पारतंत्र्यातील सर्व देशांसाठी प्रेरणा देणारे होते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात धुळ्याचाही सहभाग

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी योगदान दिले आहे. धुळे जिल्हाही स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यात मागे नव्हता. जिल्ह्यातील चिमठाणे गावाजवळ क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. जंगल सत्याग्रह, विविध आंदोलनाच्या माध्यमातून या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले होते. धुळे जिल्हा कारागृहात आचार्य विनोबा भावे, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी,  सानेगुरुजी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना बंदिवान करण्यात आले होते. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही आपल्या जिल्ह्याने योगदान दिले आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमास आपल्या जिल्हावासीयांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्वच असा म्हणावा लागेल. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण होण्याबरोबरच आपला देशाभिमानही वाढला आहे, असेही यावेळी त्यानी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button