जळगाव : कर्मचाऱ्याचा कारसह तलावात बुडून मृत्यू | पुढारी

जळगाव : कर्मचाऱ्याचा कारसह तलावात बुडून मृत्यू

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन कंपनीत फिटर पदावर काम करणाऱ्या (४२ वर्षीय) व्यक्तीचा काल (रविवार) कार शिकत असताना कार तलावात पडून मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, हा अपघात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. जावेद अलियार खाँ पठाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ते गेल्या २० वर्षांपासून जैन कंपनीत फिटर पदावर नोकरीत होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता जावेद हे कैलास राठोड यांच्यासह कंपनीची चारचाकी शिकत होते. सुमारे दोन-तीन किलोमीटर अंतर कापल्यानंतर घाटात ब्रेकऐवजी त्यांनी एक्सलेटर दाबले. यामुळे चारचाकी वेगाने घाटातून पुढे जाऊन तलावात कोसळली. या वेळी कैलास राठोड कसेबसे बचावले; पण जावेद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यांचा मृतदेह सायंकाळी साडेसात वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. दरम्यान, जावेद यांचा घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची चौकशी करून पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान जावेद अलियार खाँ पठाण हे चारचाकी वाहन शिकण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडून ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबले गेल्याने त्यांचा अपघात झाला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या शिवाय अन्य कोणतेही कारण नाही, असे कंपनीच्या वतीने अधिकारी अनिल जोशी व डी. आर. पाटील यांनी कळवले आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button