भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात 14 मुक्काम

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात 14 मुक्काम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होत असून पाचही जिल्ह्यांत या यात्रेचे स्वागत करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राततून 382 किलोमीटरचा प्रवास करताना या यात्रेचे 14 मुक्काम होतील आणि दोन जंगी सभांचे आयोजनही करण्यात आल्याचे काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पुढारीला सांगितले.

भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. नांदेडसह पाच जिल्ह्यांतून प्रवास करताना कुठे वारकर्‍यांचे रिंगण, कुठे संबळ, तर कुठे गोंधळ अशा विविध लोककला या यात्रेत सादर होतील. यापैकी नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी चार, तर अकोला येथे यात्रेचे दोन मुक्काम होतील. 10 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे पहिली सभा होईल, तर 18 नोव्हेंबरला शेगाव येथे सभा होणार असल्याचे सांगून थोरात म्हणाले, शेगावची सभा प्रचंड आणि ऐतिहासिक ठरणार आहे. शेगावच्या सभेपूर्वी राहुल गांधी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील.

संविधानिक मूल्ये, सद्भावनेसाठी ही यात्रा सुरू आहे. अलीकडे अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. राहुल गांधींना भेटणारे लोक या विषयावर आपले गार्‍हाणे मांडू शकतात. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राततील सर्व प्रमुख प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्थिक विषमता असेल, महागाई असेल इतकेच नव्हे बॉलीवूड कलाकरांना लक्ष्य करण्याचे प्रकार असे अनेक मुद्दे यानिमित्ताने चर्चेत येतील, असेही थोरात म्हणाले. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातत 14 मुक्काम स्वागताची जय्यत तयारी, संबळ वाजणार, वारकर्‍यांचे रंगणार रिंगण.

पवारांचे ठरले, ठाकरेंचे काय?

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पवार हे 8 तारखेला यात्रेत सहभागी होतील. उद्धव यांचा होकार अद्याप आलेला नाही. कदाचित आदित्य ठाकरेही यात्रेत स्वतंत्रपणे सहभागी होतील. शिवसेनेचे अनेक आमदारही यात्रेसोबत चालणार असून, बंडखोरीतून यशस्वी परतलेले आमदार नितीन देशमुख हे अकोला आणि हिंगोली असे दोन जिल्हे चालणार आहेत.

यात्रेतील दिनक्रम

साधारण सकाळी 6 वाजता सेवादलामार्फत ध्वजवंदन झाल्यानंतर या यात्रेला सुरुवात होते. पहिल्या टप्प्यात सकाळी 10.30 वाजेपर्यंत एकूण 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करते आणि विश्रांतीसाठी थांबते. संध्याकाळच्या दुसर्‍या टप्प्यात 4 ते 6.30 या वेळेत साधारण 10
किलोमीटरचे अंतर कापले जाते. त्यानंतर छोटी कॉर्नर सभा होते. अशा दहा कॉर्नर सभांचे नियोजन आहे.

मंगलकार्यालये झाली बुक

यात्रेत सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विविध भागातून हे लोक येणार आहेत. यात्रा मार्गाच्या दोन्ही बाजूने दहा किलोमीटर पर्यंतची मंगल कार्यालये लोकांनी आधीच बुक केली आहेत. यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते या मंगल कार्यालयात मुक्काम करू शकतील.

मुक्कामाची व्यवस्था

राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेतील सहकारी आणि सुरक्षा रक्षकांच्या ताफा असतो. या सर्वांच्या विश्रांती, मुक्कामाचे कंटेनर यात्रेसोबतच आहेत. मुक्काम स्थळी सर्व कंटेनरसाठी साधारण तीन एकर जागा लागते. यात्रा मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी अशा जागा नक्की करण्यात आल्या आहेत. तिथे पाणी आणि जेवणाची व्यवस्था असेल. कंटेनरसाठी जमीन सपाट करून मुरूम घालावी लागते. काही ठिकाणी मुरूम घालायला शेतकरी कचरले. मात्र, यात्रेचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिल्यानंतर उत्साहाने शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news