

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही विमानतळे बंद करण्यात आली आहेत तर सध्या सुरू असलेल्या विमानतळांसाठी नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने काही सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सुरक्षा तपासणी सुरळीत पार पडावी यासाठी विमान प्रवाशांनी नियोजित वेळेच्या 3 तास आधीच विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन विमान कंपन्यांनी केले आहे.
एअर इंडियाने एक्स या समाजमाध्यम व्यासपीठावर दिलेल्या माहितीनुसार, विमानोड्डाणाच्या 75 मिनिटे आधी विमानतळावर प्रवेश बंदी केली जाईल. त्यामुळे नियोजित वेळेच्या 3 तास आधी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचावे. यामुळे सुरक्षा तपासणी आणि विमान प्रवेश सुरळीत होऊ शकेल. स्पाइसजेटनेही 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना विमान प्रवाशांना केली आहे.
अकासा एअरने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही 3 तास आधी पोहोचण्याचा समावेश आहे. तसेच प्रवाशांनी शासनमान्य छायाचित्र ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. केवळ एकच 7 किलोची हॅण्डबॅग सोबत नेता येईल. विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांची दोनदा तपासणी केली जाईल. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, अकासा एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस, इत्यादी विमान कंपन्यांनी आपली काही विमानोड्डाणे रद्द केली आहेत किंवा त्यांची वेळ बदलली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या विमान फेरीची सद्यस्थिती तपासूनच घराबाहेर पडणे आवश्यक आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील 24 विमानतळ आता 15 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याआधी 10 मे पर्यंत हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार होते. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ही घोषणा केली. यामध्ये चंदीगढ, श्रीनगर, अमृतसर, लुधीयाना, भंटर, किशनगढ, पटियाला, सिमला, जैसलमेर, पठाणकोट, जम्मू, बिकानेर, लेह, पोरबंदर आदी विमानतळांचा समावेश आहे.
विमान प्रवाशांशिवाय इतर कोणालाही विमानतळावर प्रवेश करता येणार नाही. विमानतळाला भेट देण्यासाठी येणार्यांना तिकिटांची विक्री केली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी विमानतळावर जाणार्या नातेवाईकांना तेथे प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.