

मुंबई ः हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पक्षपातीपणा व निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप करून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत नोंद करावी व अतिरिक्त आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी करणार्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याप्रकरणाची उद्या मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे. या याचिकेमुळे आरोपी मिहीर शहा याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मिहीर शहा याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे तर चार्जशीट देखील दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या 103 कलमांतर्गत आरोपपत्रात नोंद करण्यात न आल्याने प्रदीप नाखवा यांनी पोलिसांना याबाबत पत्र लिहिले तसेच अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाखवा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. दिलीप सटाळे यांनी युक्तिवाद केला. आरोपी विरोधात अनेक पुरावे असूनही, आरोपीने केलेल्या कृत्यांना पाठीशी घातले जात आहे. आरोपी विरोधात हत्येचे आरोप लावण्यात तपास अधिकारी अयशस्वी ठरले आहेत. यातून तपासातील निष्काळजीपणा किंवा पक्षपातीपणा दिसून येतो, असा आरोप केला. खंडपीठाने याचिकेची दखल घेत यावर मंगळवारी सुनावणी ठेवली आहे.
आरोपी मिहीरने 7 जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा (45) या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला 9 जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याचा मुलगा आहे.