मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सुमारे दोन कोटीच्या उच्च प्रतीच्या गांजासह फिझा जावेद खान या महिलेस हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. तिच्याकडून या अधिकार्यांनी ४ किलो २७३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून गांजा घेऊन विमानतळाबाहेर जात असताना तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. एनडीपीएस कलमांतर्गत अटक केल्यानंतर तिला रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या काही वर्षांत विदेशात ड्रग्जची तस्करी होत असल्याने हवाई गुप्तचर विभागाने विशेष खबरदारी घेतली होती.
रविवारी पहाटे फिझा नावाची एक महिला बँकॉंक येथून आली होती. तिची हाचाल संशयास्पद वाटत होती. ती घाईघाईने विमानतळाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होती. त्यामुळे तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकार्यांना कपड्याच्या आत लपवून ठेवलेला गांजा सापडला. ४ किलो २७३ ग्रॅम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. चौकशीत तिला हा गांजा बँकॉंक येथे एका व्यक्तीने दिले होते. त्यासाठ तिला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच तिला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला अटक करण्यात आली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.