

मुंबई : ताडदेव येथील विलिंग्डन हाईट्स इमारतीमधील 32 रहिवाशांना गणपत्ती बाप्पा पावला आहे. गुरुवारी (दि.28) महापालिका आयुक्तांबरोबर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
या संकुलातील 17 ते 34 मजल्यापर्यंत राहणार्या 32 रहिवाशांना उच्च न्यायालयाने घरे खाली करण्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून हे रहिवाशी पर्यायी जागेच्या शोधात होते. गुरुवारी (दि.28) सकाळी या रहिवाशांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनाऐवजी मंत्री व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. इतर वेळी आंदोलकांना चार व्यक्तींपेक्षा अधिकजणांना पालिका मुख्यालयात प्रवेश दिला जात नाही. परंतु मोठ्या संख्येने रहिवासी मुख्यालयात गेले होते. ही बैठक अतिशय गुप्तपणे झाली. यात आयुक्तांनी ओसी देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून संबंधित विभागाला आदेश देऊन विलिंग्डन हाईटच्या इतर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे विलिंग्डन हाइट्स मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात रहिवाशांची चूक नसून बिल्डरकडून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून विलिंग्डन हाइट्सच्या प्रलंबित असलेल्या ऑक्युपॅन्सी सर्टिफिकेट (OC) रखडलेल्या होत्या असे निदर्शनास आले होते. परंतु रहिवाशांची बाजू समजून घेत आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सदर गंभीर बाब कानी घातल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. समस्त रहिवाशांनी गणपती बाप्पामुळे आमच्यावर आलेलं संकट टळल्याचा आनंद व्यक्त केला आहे.