

मुंबई ः राज्य विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर राज्यामध्ये काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम आणि यशोमती ठाकूर या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
प्रदेश काँग्रेसने गेल्या महिन्यात आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा लढवून केवळ 16 जागा जिंकल्या. स्वातंत्र्यानंतरची आजवरची काँग्रेसची ही सर्वाधिक खराब कामगिरी होती. त्यामुळे पटोले यांचा लगेच राजीनामा मागितला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, निकालानंतर जवळपास 20 दिवसांनी पटोले यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे कळते. निकालानंतर लगेच पटोले यांनी नवी दिल्ली गाठत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी अलीकडेच महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत दिले होते.
पटोले यांच्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण बसणार याबाबत चर्चा रंगली आहे. कोल्हापूर येथील काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश प्राप्त झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून सतेज पाटील यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्र व मराठा समाजाकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपविले जाईल, अशी चर्चा आहे.
सतेज पाटील यांच्यासोबतच माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांनी लोकसभेत सांगली पॅटर्न राबवून मूळ काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा अपक्ष उमेदवार म्हणून विजय निश्चित केला होता. याशिवाय पतंगराव कदम यांचा राजकीय वारसा व भारती विद्यापीठ या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर असलेले संस्थांचे जाळे ही त्यांची शक्ती आहे.