

मुंबई : सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडे तगड्या उमेदवाराचा अभाव असल्याने भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र आपल्या कोट्यातील जागा सोडण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार होत नसल्याने आता भाजपमध्ये असलेले माजी खासदार नीलेश राणे हेच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता आहे.
भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने निलेश राणेंच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार निलेश राणे यंदा कुडाळ मालवणमधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. राणेंसोबतच्या भेटीनंतर शिंदेंनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी तात्काळ उदय सामंतांना वर्षावर बोलावल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केल्यानंतर हा मतदारसंघ शिव- सेनेचा बालेकिल्ला झाला आहे.
नीलेश राणे हे कोकणातल्या लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारे एक चांगले युवा नेते आहेत. त्यांच्याबाबत आज राणे साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. फक्त नीलेश राणे हे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत इतकेच मला माहीत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. नीलेश राणे यांनी असा निर्णय घेतल्यास महायुतीची संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे उभी करू, असे सामंत म्हणाले.