

मुंबई : विलेपार्ले भागातील कांबळीवाडी येथील पालिकेकडून पाडण्यात आलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे ढिगारे रविवारी पालिकेच्या कर्मचार्यांनी हटवले. आता पालिकाच हे मंदिर बांधून देणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
16 एप्रिल रोजी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेकडून कारवाई करून ते जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. त्यानंतर जैन बांधव व्यथित झाले. त्यांनी शनिवारी मोठा मोर्चा काढत या कारवाईबद्दल निषेध नोंदवला. आता त्या ठिकाणी रविवारपासून जैन समाजाने पूजा सुरू केली आहे. पूजा करतेवेळी अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले होते.
मंदिराच्या सर्व भिंती तुटल्या असून, मंदिराला दरवाजेसुद्धा नाहीत. असे असताना जैन बांधवांनी त्या ठिकाणी पूजा केली. भगवान महावीर यांच्यासमोर भाविक नतमस्तक झाले. मंदिर तोडल्याचा संताप भाविकांमध्ये दिसून आला. भाविकांनी सांगितले की, जोपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मंदिर तोडलेल्यांना माफ करणार नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. जैन समुदायातील दक्षिण भारत जैन सभेने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून जैन मंदिराच्या पुनर्बांधणीची मागणी केली. याप्रकरणी दक्षिण भारतीय जैन सभेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंदिरावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून त्यांना निवेदन दिले आहे. जैन समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कारवाईत भाग घेतलेले सहायक आयुक्त नवनाथ घाडगे यांची बदली केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने खटल्याला स्थगिती देऊनही मंदिर घाईघाईने पाडण्यात आले. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच ठिकाणी पुन्हा नवीन मंदिर तत्काळ बांधण्यात यावे, अशी मागणी जैनधर्मीयांनी केली.