

मुंबई : पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अमोल भाऊलाल राऊत या पोलीस पतीला अखेर वनराई पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने अमोल हा पळून गेला होता, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सारिका आणि अमोल हे मूळचे नाशिकचे रहिवाशी आहेत.
अमोल हा राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक असून सध्या तो गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस वसाहतीत राहत होता. नऊ वर्षांपूर्वी त्याचे सारिकासोबत लग्न झाले होते. त्यानंतर ती त्याच्यासोबत गोरेगाव येथील घरी राहत होती. लग्नानंतर सात वर्ष सुरळीत गेले, मात्र गेल्या दोन वर्षांपासून अमोलचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले होते. या प्रेमसंबंधावरुन त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.
सतत होणार्या भांडणानंतर अमोल हा दारुच्या नशेत तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तिचे सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. आठ दिवसांपूर्वी सारिका ही एकटीच घरी होती तर अमोल हा कामानिमित्त पुण्याला गेला होता. घरात असताना सारिकाने गळफास घेऊन जीवन संपवले. यानंतर अमोल पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.