तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा येत्या 6 जुलै रोजी आपल्या उत्तराधिकार्याची निवड जाहीर करणार आहेत. पुढील दलाई लामाची निवड गादेन फोड्रांग ट्रस्ट ही 600 वर्षे जुनी संस्था करणार असल्याचे दलाई लामांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे जाहीर केले आहे.
दलाई लामांचे उत्तराधिकारी 15 वे दलाई लामा असतील. सध्याचे 14 वे दलाई लामा 6 जुलै रोजी 90 वर्षांचे होतील. याच मुहूर्तावर ते त्यांच्या मृत्यूनंतरचा उत्तराधिकारी कोण असेल ते जाहीर करणार आहेत.
लामाच्या नियुक्तीतुन चीनला पूर्णपणे वगळण्यात आल्याने चीन आणि दलाई लामा यांच्यात पून्हा संघर्ष सुरु झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि दलाई लामा यांच्यात संघर्ष सुरु आहे. चीनने 14 वे दलाई लामा यांना बंडखोर म्हणून घोषित केल्यानंतर 1959 मध्ये ल्हासामध्ये चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या बंडानंतर दलाई लामा भारतात आले. तेव्हापासून ते भारतातच आहेत. मात्र असे असले तरी तिबेटमधील सर्व धर्मविषयक निर्णय तेच घेतात.
सध्याचे म्हणजेच 14 वे दलाई लामा यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो आहे. तिबेटी नागरिक सर्वोच्च धार्मिक नेत्याला ‘दलाई लामा’ म्हणतात. सध्याच्या दलाई लामा यांची निवड त्यांच्या वयाच्या दुसर्या वर्षी करण्यात आली होती आणि त्यांना 14 व्या वर्षी ल्हासा येथे आणण्यात आले होते.
दलाई लामा यांची निवड आध्यत्मिक प्रक्रियेद्वारे केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया तिबेटी बौद्ध धर्माच्या श्रद्धेवर आधारित असते. तिबेटी बौद्ध धर्माचा असा विश्वास आहे की, दलाई लामा पुनर्जन्म घेतात. त्यामुळे जेव्हा दलाई लामा यांचे निधन होते, तेव्हा त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र कोणता मुलगा दलाई लामा होईल हे अनेक टप्प्यांत चालणार्या प्रक्रियेनंतर ठरवले जाते.
दलाई लामा यांचा अवतार भविष्यवाणीच्या आधारे शोधला जातो. यासाठी त्यांच्या मृत शरीराची दिशा, त्यांची स्वप्ने, पवित्र सरोवरात दिसणारे कोणतेही विशेष दर्शन आणि दिवंगत दलाई लामांच्या शेवटच्या काळातील चिन्हे या आधारावर दलाई लामा यांच्या उत्तराधिकार्याचा शोध घेण्यात येतो. दलाई लामा यांचा संभाव्य अवतार शोधल्यानंतर, त्यांना मागील दलाई लामांच्या काही गोष्टी दाखवल्या जातात. त्या गोष्टी तो ओळखू शकतो की, नाही हे पाहिले जाते आणि जर त्यांनी त्या ओळखल्या तर त्यांना गुरुचा पुनर्जन्म मानले जाते. यानंतर, तिबेटी धार्मिक अधिकार्यांकडून पुष्टी मिळाल्यानंतर पुढील दलाई लामांची घोषणा करण्यात येते. दलाई लामांच्या अधिकृत घोषणेनंतर, त्यांना बौद्ध धर्माचे तत्वज्ञान शिकवले जाते, दीक्षा दिली जाते आणि तिथल्या परंपरांचा भाग बनवले जाते.
दलाई लामा हे तिबेटी बौद्धांचे आध्यात्मिक प्रमुख आहेत. त्यांचे जीवन दया, करुणा, अहिंसा आणि ज्ञान या आदर्शांवर आधारित आहे. बौद्ध धंम्माला पुढे नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना तिबेटी ओळख आणि संस्कृतीचे रक्षक म्हणूनही ओळखले जाते. दलाई लामा हे तिबेटी लोकांच्या, विशेषतः निर्वासित जीवन जगणार्यांच्या आशांचे प्रतिनिधित्व करतात. 1959 पर्यंत दलाई लामा धर्म आणि राजकारण या दोन्हींचे प्रमुख होते. सध्या ते राजकारणातून निवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे बौद्ध गुरू असूनही, त्यांचे संदेश आणि शिकवण सर्व धर्म आणि संस्कृतींसाठी प्रेरणादायी आहे.
दलाई लामांच्या उत्तराधिकार्यांवर नियंत्रण ठेवून चीन तिबेटी बौद्ध धर्म आणि तिबेटी लोकांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी कधीपासूनच प्रयत्नशील आहे. त्यामुळे तिबेटी लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार केवळ आपल्याकडे असल्याचा दावा चीन दीर्घकाळापासून करत आलेला आहे. चीनने तिबेटी बौद्ध धर्मातील दुसरे सर्वोच्च आध्यात्मिक नेते म्हणजेच पंचेन लामा, याआधीच जाहीर केले आहेत. चीनच्या या कुरापतींची जराही दखल न घेता दलाई लामांनी गादेन फोड्रांग ट्रस्टवर पुढचा दलाई लामा निवडण्याची जबाबदारी सोपवल्याने चीन संतापला आहे.