

> ग्रामीण भागातील महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे
> प्रत्येक 'उमेद मॉल'च्या उभारणीसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च
> बाजारपेठांमधील दलाल किंवा मध्यस्थांचे उच्चाटन
Umed Mall Maharashtra Explained In Marathi
राजेंद्रकुमार चौगुले
'उमेद मॉल' हा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत चालवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा व यशस्वी उपक्रम आहे. हा पारंपरिक मॉल किंवा दुकान नसून, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे व्यासपीठ आहे. उमेद मॉल म्हणजे बचत गटांच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींनी अतिशय कष्टाने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी हकाची बाजारपेठ होय. या मॉलची संकल्पना काय आहे, ते समजून घेऊ...
उमेद मॉलची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये काय आहेत?
बाजारपेठ उपलब्ध करणे : ग्रामीण महिला खूप चांगल्या दर्जाच्या वस्तू बनवतात; पण त्यांना त्या विकण्यासाठी योग्य जागा किंवा बाजारपेठ मिळत नाही. 'उमेद' या उपक्रमाद्वारे त्यांना ही हक्काची बाजारपेठ मिळवून दिली जाते.
मध्यस्थांचे उच्चाटन : अनेकदा दलाल किंवा मध्यस्थ या महिलांकडून कमी किमतीत वस्तू घेऊन जास्त नफ्यात विकतात. 'उमेद मॉल' मुळे महिला थेट ग्राहकांना वस्तू विकू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळतो.
महिला सक्षमीकरण : या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते. त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात.
उमेद मॉलमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू मिळतात? येथे मिळणाऱ्या सर्व वस्तू ग्रामीण महिलांनी हाताने आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या असतात.
उमेद मॉलमध्ये कोणत्या उत्पादनांचा समावेश असतो?
खाद्यपदार्थ : विविध प्रकारचे पापड, लोणची, मसाले, चटण्या, कुरडया, शेवया, सेंद्रिय धान्य आणि कडधान्ये, तूप, मध इत्यादी.
हस्तकला वस्तू : बांबूच्या वस्तु, सजावटीच्या वस्तु, पर्स, बॅग्ज, शोभेच्या
वस्तू वस्त्रप्रावरणे : हाताने विणलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल, चादरी, तोरण
आरोग्य आणि सौंदर्य : नैसर्गिक साबण, अगरबत्ती, धूप, उटणे
उमेद मॉलच्या कामाचे स्वरुप कसे आहे?
ऑनलाईन प्लॅटफॉर्म
'उमेद'ने स्वतःचे ऑनलाईन पोर्टल आणि अॅप विकसित केले आहे. याशिवाय अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांसोबत करार करून बचत गटांच्या वस्तू संपूर्ण देशभरात विकल्या जातात. यामुळे शहरातील ग्रात्तक घरबसल्या ग्रामीण महिलांनी बनवलेल्या शुद्ध आणि दर्जेदार वस्तू मागवू शकतात.
ऑफलाईन विक्री केंद्र
आणि प्रदर्शन मोठमोठी शहरे, विमानतळ, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी 'उमेद' ची कायमस्वरूपी किंवा तात्पुरती विक्री केंद्रे (स्टॉल्स) उभारली जातात. याशिवाय दिवाळी, दसरा, संक्रांत अशा सणांच्या वेळी किंवा जत्रा प्रदर्शनांमध्ये 'उमेद'चे मोठे स्टॉल्स लावले जातात, जिथे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.