
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अभिजात भाषा या भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या राखणादार आहेत, असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे.
भारतात यापूर्वी तामिळ, मल्याळम, संस्कृत, तेलुगु, कन्नडा आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला होता. आता नव्याने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना हा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने १२ ऑक्टोबर २००४ रोजी 'अभिजात भाषा' हा भारतीय भाषांसाठीची नवी श्रेणी जाहीर केली. सर्वप्रथम तामिळ भाषेला हा दर्जा मिळाला. त्यानंतर साहित्य अकादमीच्या कार्यक्षेत्रात Languistic Experts Committee स्थापन करण्यात आली. पुढील काळात संस्कृत, तेलुगु, कन्नडा, मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा दिला.
भाषेचे प्राचीनत्त्व - या भाषेत प्राचीन साहित्य असले पाहिजे आणि १५०० ते २००० वर्षांच्या कालावधितील लिखित इतिहास असला पाहिजे.
भाषेचा वारता - भाषा बोलणाऱ्यांकडून या भाषेतील लक्षणीय अशा प्राचीन साहित्याचे जतन केले गेले असले पाहिजे.
अस्सलपणा - या भाषेची स्वतंत्र आणि लक्षवेधी साहित्य परंपरा असली पाहिजे.
आधुनिक भाषा आणि प्राचीन भाषेत फरक असला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार - अभिजात भारतीय भाषांतील दोन अभ्यासकांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.
सेंटर ऑफ एक्सलन्स - अभिजात भाषांवर संशोधन करण्यासाठी A Centre of Excellence for Studies in Classical Languagesची स्थापना केली जाते.
अध्यसनांची स्थापना - अभिजात भाषांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये अध्यासनांची स्थापना होते.