

मुंबई: पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करीरोड आणि लोअर परळ स्थानकादरम्यान ९८ कोटी रुपये खर्चून नवीन कोचिंग डेपो उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे हा डेपो केवळ गाड्यांच्या देखभालीपुरता मर्यादित न राहता, दादर येथून सुटणाऱ्या नव्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एक मोठे हब बनणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांनी स्पष्ट केले.
सध्या मुंबई सेंट्रल व दादर टर्मिनसवर गाड्यांच्या पार्किंग, स्वच्छता, तांत्रिक तपासणी करण्यासाठी जागेची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी मागणी असूनही पश्चिम रेल्वेला दादरहून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे अशक्य होत आहे.
मात्र, करीरोड येथील मध्य रेल्वेच्या 'जनरल स्टोअर डेपो'ची ५५,००० चौरस मीटर जागा ठाकुर्लीला स्थलांतरित करून तेथे पश्चिम रेल्वेचा हा डेपो साकारला जाणार आहे. सुमारे ९८ कोटी खर्चून दोन टप्प्यांत उभारल्या जाणाऱ्या या डेपोचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या डेपोमध्ये एकूण १० रेल्वे मार्गिका असणार आहेत. यातील ६०० मीटर लांबीच्या दोन विशेष 'पिट लाईन्स' आणि ६ पार्किंग लाईन्समुळे एकाच वेळी 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या दोन पूर्ण लांबीच्या गाड्यांची दुरुस्ती व देखभाल करणे शक्य होणार आहे. हा डेपो कार्यान्वित होताच मुंबई सेंट्रल डेपोवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
परिणामी, दादर स्थानकावरून दररोज किमान ५ ते ६ अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच, ब्रिटिशकालीन ग्रँट रोड पार्सल डेपोच्या पुनर्विकासाचा प्रकल्पही याला जोडला गेल्याने मुंबईतून एकूण १० ते १५ नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या धावू शकणार आहेत.