

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी नेहमीप्रमाणे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्री 12.30 ते पहाटे 4.00पर्यंत ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील विरार, वसई रोड, बोरिवली, भाईंदरदरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील लोकलसेवा जलद मार्गावरून धावतील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यातही येणार आहेत.
मध्य रेल्वेवर रविवारी लोकल सेवा विलंबाने धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.30 या दरम्यान सुटणार्या डाउन जलद, अर्ध जलद लोकल ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा त्या दहा मिनिटे विलंबाने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणार्या डाउन मेल एक्स्प्रेस ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर वळविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथे येणार्या अप मेल-एक्स्प्रेस कल्याण-ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर रेल्वेमार्गावर वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक असेल. मानखुर्द स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावरील लोकलसेवा सकाळी 9:40 ते दुपारी 3.28 दरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/ वाशी दरम्यानची लोकल सेवा सकाळी 10.14 ते दुपारी 3:54 दरम्यान डाऊन मार्गावरील लोकलसेवा बंद राहील. पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4.30 दरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.