Water supply secured : 15 जून 2026 पर्यंतची पाणीचिंता मिटली
मुंबई : मुंबई शहराच्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तलावांमध्ये 15 जून 2026 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. यात मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्या राज्य सरकारच्या भातसा तलावातील पाणीसाठा 86 टक्के तर नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठा 81 टक्केवर पोहोचला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1,193 मिमी ते 2105 मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्या तलाव क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा 88.70 टक्केवर म्हणजे 12 लाख 83 हजार 721 दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे. शहराला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. हे लक्षात घेता मुंबईकरांना 15 जून 2026 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्याला अजून दोन महिने असल्यामुळे तलाव 100 टक्के भरतील, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
मुंबई शहराला राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा तलावातून निम्म्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा करण्यात येतो. हे तलावही आता भरत आले आहेत. 2024 च्या तुलनेत यंदा 28 जुलैपर्यंत 16 टक्के जास्त पाणी साठा आहे. गेल्या वेळी 72 टक्के पाणीसाठा होता यावेळी 88 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईत फारसा पाऊस नसल्यामुळे तुळशी व विहार तलावातील पाणीसाठ्यात मात्र संथगतीने वाढ होत आहे.

